अवैध सावकारी प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 09:56 PM2018-01-31T21:56:29+5:302018-01-31T21:56:43+5:30
यवतमाळ शहर व परिसरात चालणारी अवैध सावकारी, त्यातूनच गुन्हेगारीला मिळणारे आर्थिक पाठबळ सध्या जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ शहर व परिसरात चालणारी अवैध सावकारी, त्यातूनच गुन्हेगारीला मिळणारे आर्थिक पाठबळ सध्या जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हीच अवैध सावकारी व्याजचक्राच्या जाळ्यात अडकलेल्या अनेकांच्या जीवावर उठली असून भविष्यात त्यातून रक्तरंजित परिणाम पुढे येण्याची भीती आहे.
अवैध सावकारीने गेल्या काही महिन्यात तिघांचे खून झाले आहेत. अलिकडेच आरटीओ कार्यालय परिसरात सावकारीतून खुनाची घटना घडली होती. अवैध सावकारीच्या व्याजचक्रातूनच नुकत्याच दोन प्रतिष्ठीत व्यापाºयांनी आत्महत्या केल्या. या सावकारीवर प्रशासनाने आत्ताच नियंत्रण न मिळविल्यास लगतच्या भविष्यात आणखी काहींचे खून होण्याची आणि काहींना आपली जीवनयात्रा संपवावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अवैध सावकारीचे भलेमोठे जाळे यवतमाळ शहर व परिसरात विणले गेले आहेत. या सावकारीसाठी संपत्तीच्या खरेदीचा देखावा निर्माण केला जातो. कुणी व्याजाने पैसे मागण्यासाठी गेल्यास त्याची संपत्ती लिहून घेतली जाते. इसार झाल्याचे दाखवून मालमत्तेच्या किंमतीच्या अर्धी रक्कम सावकारीत दिली जाते. त्याला तीन टक्क्यापासून पुढे कितीही टक्क्यापर्यंत व्याज आकारले जाते. या व्यवहाराची नोटरी करून संपत्तीचा इसार झाल्याचे दाखविले जाते. यवतमाळात बहुतांश व्यापाऱ्यांनी अवैध सावकारीतून कर्ज घेतले आहे. काहींनी सावकारीची ही रक्कम पुढे जास्त व्याजदराने वाटली आहे. तर काहींनी स्वत:च्या कामासाठी या रकमा घेतल्या. व्याजातील या रकमेच्या वसुलीसाठी सावकारांनी काही गुंडही पोसले आहेत. या गुंडांकडून अडकलेली सावकारीतील वसुली केली जाते. त्यातूनच गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांमध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण झाली आहे. अशा अवैध सावकारीच्या माध्यमातून प्लॉट, फ्लॅट, शेती, घर या सारखी स्थावर मालमत्ता अर्ध्या किंमतीत हडपली गेली आहे. वर्षानुवर्षे व्याज देऊन घेतलेल्या रकमेपेक्षा दुप्पट-तिप्पट रक्कम चुकविली तरी मूळ मुद्दल कायमच आहे. ही अवैध सावकारी प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळेच खून, आत्महत्या या सारख्या घटना घडत आहेत. या अवैध सावकारीवर सहकार प्रशासनाचे थेट नियंत्रण अपेक्षित आहे. मात्र सहकार विभाग केवळ सावकारी परवान्यापर्यंतच कारवाईसाठी मर्यादित राहत असल्याचे चित्र आहे. या विभागाला कारवाईसाठी कुणाची तरी तक्रार लागते. अवैध सावकारीमध्ये दरदिवशी कोट्यवधींची उलाढाल होत असताना शासनाचा प्राप्तीकर विभाग नेमका आहे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्राप्तीकर विभाग व सहकार प्रशासनाच्या मेहरनजरमुळेच यवतमाळात अवैध सावकारी फोफावल्याचे मानले जाते. सावकारांसाठी वसूलकर्ता म्हणून काम करणाऱ्या गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना स्थानिक पोलिसांचे अभय लाभते. त्यामुळे तेसुद्धा कधी रेकॉर्डवर येत नाहीत. घटना घडल्यानंतरही पोलिसांकडून अनेकदा सावकारीचे कारण दडपण्याचे प्रयत्न होतात.
सावकारांचा म्होरक्या जाजू चौकात
यवतमाळ शहरातील अवैध सावकारीचा सर्वात मोठा म्होरक्या जाजू चौक परिसरात असल्याचे सांगितले जाते. एका एजंसीच्या आडून ही सावकारी केली जाते. हॉटेल व्यवसायातील हा प्रतिष्ठीत सावकार संपूर्ण यवतमाळात दरमाह कोट्यवधी रुपयांची रक्कम वाटतो. त्याच्या व्याजातील उलाढालही कोट्यवधींच्या घरात असल्याची माहिती आहे. त्याची ही उलाढाल प्राप्तीकर खात्याच्या नजरेतून अनभिज्ञ कशी? याचेच आश्चर्य अनेकांना वाटते आहे.