सहायक आयुक्तांमुळे अडली समाजकार्यची थकबाकी
By Admin | Published: August 20, 2016 12:32 AM2016-08-20T00:32:01+5:302016-08-20T00:32:01+5:30
समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीपासून वंचित
यवतमाळ : समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीपासून वंचित ठेवण्यात समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्तच जबाबदार असल्याचा ठपका अमरावतीच्या प्रादेशिक उपायुक्तांनी ठेवला आहे. या प्रकरणी प्राध्यापकांच्या तक्रारीवरून समाजकल्याण आयुक्तांनी चौकशीचे निर्देश दिले होते. आता या प्रकरणी सहाय्यक आयुक्तांवर काय कारवाई होते आणि प्राध्यापकांची थकबाकी केव्हा मिळते याकडे लक्ष लागले आहे.
पुसद येथील गुलामनबी आझाद समाजकार्य महाविद्यालय व सावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीपासून वंचित होते. त्यांनी यवतमाळच्या सहाय्यक आयुक्त विजय साळवे यांच्याकडे वारंवार याबाबत पाठपुरावा केला. परंतु उपयोग झाला नाही. उलट या कर्मचाऱ्यांना सहाय्यक आयुक्तांनी लाच मागितल्याचा आरोप करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. त्यावरून आयुक्तांनी अमरावती येथील प्रादेशिक उपायुक्त दीपक वडकुते यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी केली असता, सदर कर्मचाऱ्यांची थकबाकीची देयके वेळीच कोषागारात सादर करून कोषागाराकडून देयके मंजूर झाली आहे. परंतु सहाय्यक आयुक्तांनी प्राप्त देयकाचे बीडीएस काढले नाही. त्यामुळे एक कोटी ५३ लाख ३६ हजार ३६० रुपये शासन समर्पित झाले. यावरून तक्रारकर्त्या दोन्ही महाविद्यालयाच्या देयकाचे बीडीएस काढण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. संबंधित महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याचे दिसून येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. आता या प्रकरणी समाजकल्याण आयुक्तालय यवतमाळच्या सहाय्यक आयुक्तांवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विजय साळवे यांची बदली झाली आहे. या बदलीविरोधात साळवे यांनी मॅटमध्ये धाव घेतली आहे. वेतन फरकाची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ केल्याचा ठपका साळवे यांच्यावर चौकशीतून ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याऐवजी केवळ बदली करूनच प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आले. आता साळवे यांच्याबाबत समाजकल्याण आयुक्त पुणे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (कार्यालय प्रतिनिधी)