रात्रीच्या ओलिताने जीव धोक्यात

By admin | Published: November 29, 2015 03:01 AM2015-11-29T03:01:40+5:302015-11-29T03:01:40+5:30

वीज महावितरण कंपनी कृषी पंपासाठी दिवसाऐवजी मध्यरात्रीपासून वीज पुरवठा देत असल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना ...

Overnight life threatens life | रात्रीच्या ओलिताने जीव धोक्यात

रात्रीच्या ओलिताने जीव धोक्यात

Next

वाघ, रानडुक्कर, रोह्यांची भीती : वीज वितरण कंपनीचा कारभार
यवतमाळ : वीज महावितरण कंपनी कृषी पंपासाठी दिवसाऐवजी मध्यरात्रीपासून वीज पुरवठा देत असल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून ओलितासाठी शेतात जावे लागत आहे. रानडुक्कर, रोही, बिबट व पट्टेदार वाघांसह सरपटणाऱ्या प्राण्यांचीही या शेतकऱ्यांना भीती आहे.
जिल्ह्यातील आठ तालुक्यात खरीप हंगाम बुडाल्याची नोंद शासन दप्तरी झाली आहे. वास्तविक उर्वरित आठ तालुक्यातही खरिपाचे पीक बुडाले आहे. मात्र हेतुपुरस्सर त्याची आणेवारी ५० टक्क्याच्यावर काढण्यात आली आहे. अंतिम आणेवारीत कदाचित यातील काही तालुके दुष्काळात आलेले दिसतील. खरीप हंगाम बुडाल्यानंतर शेतकऱ्यांनी कसाबसा रबी हंगाम वाचविण्यासाठी धडपड चालविली. मात्र वीज वितरण कंपनीचा थंड बस्त्यातील कारभार त्यात अप्रत्यक्ष खोडा निर्माण करतो आहे. जिल्ह्यात रबीचे क्षेत्र दोन लाख हेक्टर एवढे आहे. परंतु आतापर्यंत केवळ ९० हजार हेक्टरमध्येच रबीची पेरणी झाली आहे. त्यातही गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा सध्याच दहा हजार हेक्टरने अधिक असल्याचा सांगून कृषी खात्याची यंत्रणा आपली पाठ थोपटताना दिसत आहे. जानेवारी अखेरपर्यंत रबीची पेरणी एक ते सव्वा लाख हेक्टरवर होणार असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना ओलितासाठी दिवसा सुर्योदय ते सुयास्त या काळात वीज हवी आहे. परंतु वीज कंपनी मध्यरात्रीनंतर वीजपुरवठा करते. रात्रीची वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री शेतात जावे लागते. जिल्ह्यात आधीच शेतशिवाराला लागून घनदाट जंगल आहे. या जंगलात रानडुक्कर, रोही व अन्य प्राण्यांच्या झुंडीच्या झुंडी राहतात. रानडुकरांनी यापूर्वी अनेकांचा बळी घेतला आहे. वणी, पांढरकवडा विभागात टिपेश्वर अभयारण्यामुळे बिबट, पट्टेदार वाघांचेही अनेकदा दर्शन झाले आहे. त्या भागातील शेतकऱ्यांना या वाघ व बिबटाचा धोका आहे. याशिवाय सापासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वेगळाच. रात्रीची वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. मंत्री-आमदारांनी सांगूनही वीज वितरण कंपनी कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यास तयार नाही. मुळात जिल्ह्यात वीज वहनाचे पुरेसे व सक्षम जाळे नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.
शेतात वीज पोहोचलेल्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विजेची ही अवस्था आहे. मात्र आजही शेकडो शेतकरी कृषी पंपाला वीज जोडणी मिळावी म्हणून प्रतीक्षेत आहेत. कुठे पोल आहे, तर कुठे तारा नाहीत, अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी डीपी, फिडर जळाले आहेत. त्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसतो आहे. वीज कंपनी कार्यालयात सतत येरझारा मारूनही फिडर-डीपीची दुरुस्ती होवू शकलेली नाही. वीज पुरवठ्याच्या प्रतीक्षेत संपूर्ण रबी हंगाम हातचा जाण्याची भीती आहे. सत्ताधारी पक्षाचे पाच आमदार आणि ऊर्जामंत्री विदर्भाचे असताना आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना रात्रीला जीव धोक्यात घालून ओलितासाठी जावे लागते यातच खरे राजकीय अपयश दडलेले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

वीज आहे, पण वहनाची व्यवस्थाच नाही
पारेषण कंपनीच्या सूत्रानुसार जिल्ह्यात कृषी पंपांसाठी भरपूर वीज उपलब्ध आहे. मात्र त्याच्या वहनाचे जाळे नसल्याने पुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. यवतमाळला वर्धेच्या २२० केव्ही उपकेंद्रातून वीज पाठविली जाते. मात्र ही वीज वाहिनी ओव्हरलोड होत आहे. या वाहिनीची वीज वहनाची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे वीज उपलब्ध असूनही इमर्जन्सी भारनियमन करावे लागत आहे. त्यातही कमी महसूल देणाऱ्या फिडरवर अधिक भारनियमन करण्याकडे वितरण कंपनीचा कल असतो. वर्धेवरून २२० केव्हीच्या दोन वाहिन्यांद्वारे यवतमाळ जिल्ह्याला वीज पुरवठा केला जातो. एक वाहिनी थेट पुसदला, तर दुसरी वाहिनी यवतमाळ व तेथून पुसदला जोडली गेली आहे. पुसदच्या वाहिनीवरून दारव्हा, दिग्रस व अन्य तालुक्यांना वीज पुरवठा केला जातो. पुसदवरूनच पुढे मराठवाड्यात वीज पाठविली जाते. वणी विभागाला चंद्रपूर येथून २२० केव्ही वाहिनीद्वारे वीज पुरवठा होतो. यवतमाळसारखीच कृषी पंपाच्या भारनियमनाची समस्या लगतच्या अमरावती जिल्ह्यातही कायम आहे. पूर्ण दाबाची वीज न मिळणे हेसुद्धा भारनियमनाचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. यामुळे विजेचा वापरही अधिक प्रमाणात होत असल्याचे सांगण्यात आले.

पुसदमध्ये नवे २२० केव्ही केंद्र
वर्धा जिल्ह्यातून पुसदसाठी २२० केव्हीचे नवे पारेषण उपकेंद्र बनविले जात आहे. देवळी ते घाटोळी अशी ही वाहिनी आहे. पुसदपासून १२ किलोमीटर अंतरावर हे केंद्र होत आहे. या उपकेंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील वीज वहन व त्यातून निर्माण होणारी भारनियमनाची समस्या कायम स्वरूपी निकाली निघणार असल्याचे सांगण्यात आले. या घाटोळी उपकेंद्राचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र या कामाची गती संथ आहे. वास्तविक आतापर्यंत हे उपकेंद्र कार्यान्वित होणे अपेक्षित होते.

Web Title: Overnight life threatens life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.