लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 12:51 PM2021-07-29T12:51:39+5:302021-07-29T12:54:02+5:30
Yawatmal News अद्यापही १२ लाख ४० हजार नागरिकांना लस मिळायची आहे. यातही अनेक नागरिकांना दोन वेळेस लसही मिळाली नाही. यातून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याला २० लाख लसीची आवश्यकता होती. आतापर्यंत सात लाख ६० हजार नागरिकांनाच लसीकरण पूर्ण करता आले आहे. अद्यापही १२ लाख ४० हजार नागरिकांना लस मिळायची आहे. यातही अनेक नागरिकांना दोन वेळेस लसही मिळाली नाही. यातून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. याच गतीने लसीकरण सुरू राहिले तर पुढील दोन वर्ष लसीकरणासाठी लागतील, अशी भीती अभ्यासक वर्तवित आहे.
लसीकरण का वाढेना
केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून राज्याला लसीचा पुरवठा करण्यात येतो. राज्याचे आरोग्य विभाग लोकसंख्येनुसार लसीचे वितरण करते. लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली तर लसीचा कोटा मोठा मिळतो. मात्र जिल्ह्याला आतापर्यंत एकदाच ५५ हजार लसीचा पुरवठा झाला. यानंतर मात्र १२ हजार, १५ हजार, १८ हजार अशा पद्धतीची लस उपलब्ध होत आहे. यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला.
११८ केंद्रांत सुरू आहे लसीकरण
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी लसीची आवश्यकता आहे. असे असतानाही जिल्ह्याला पाहिजे त्या प्रमाणात अजूनही लस उपलब्ध झाली नाही. यामुळे जिल्ह्याने २५६ केंद्रांची लसीकरणाची तयारी ठेवलेली असताना प्रत्यक्षात ४० ते ११८ केंद्रापर्यंत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. ज्या प्रमाणात लस उपलब्ध होईल त्याच प्रमाणात लसीचे वितरण केंद्रांवर करण्यात येत आहे. यामुळे पूर्ण क्षमतेने केंद्र अजूनही सुरू करता आले नाही.
अद्याप पहिलाच डोस मिळेना.... !
कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा यवतमाळ शहरात करण्यात आला. यामुळे दुसरा डोस मिळण्याच्या प्रतीक्षेत अनेक लाभार्थ्यांना लसीकरण केंद्रावर सतत येरझारा माराव्या लागल्या. सरतेशेवटी लस उपलब्ध झाली. मात्र अनेकांना अजूनही कोविशिल्ड मिळाली नाही.
- नंदा वासनिक
लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. पाहिजे त्या प्रमाणात लसच उपलब्ध नाही. अनेक वेळा तर कोव्हॅक्सिन लस असल्याने वापस यावे लागले. कोविशिल्डला प्राधान्य असले तरी अद्यापही लस उपलब्ध झाली नाही. यामुळे काळजी वाटते आहे.
- सुधीर बुटले