लोकसभेचे पडघम : महाविकास आघाडीचा वेढा भावना गवळी कसा तोडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 10:34 AM2023-05-24T10:34:03+5:302023-05-24T10:34:39+5:30
काँग्रेसच्या जुन्या बालेकिल्ल्यात सहाव्यांदा लोकसभेची वाट बिकट, महाविकास आघाडीची जोरदार तयारी; धडा शिकविण्याचा ठाकरे गटाचा निर्धार
श्रीमंत माने/सुरेंद्र राऊत
नागपूर/यवतमाळ : सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाचे आमदार, जो एकमेव स्वत:च्या पक्षाचा त्याच्यासोबत मतभेदाची पार्श्वभूमी, अशावेळी यवतमाळ-वाशिमच्या पाचवेळच्या खासदार भावना गवळी यांच्या सहाव्या विजयाचे शिवधनुष्य भाजपलाच पेलावे लागणार आहे. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मात्र विदर्भात धनुष्यबाणाची जागा सोडायला तयार होणार नाही. थोडक्यात, भाजप व शिंदे यांच्या महायुतीमधील प्रामाणिकपणाचा कस या मतदारसंघात लागणार आहे.
आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढल्या जातील, असे भाजप नेते वारंवार सांगत आहेत. त्याचा विचार करताही यवतमाळ-वाशिमची जागा राज्यभराचे लक्ष वेधून घेईल. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड व वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, यवतमाळ, दिग्रस व पुसद या सहा विधानसभांपैकी लखन मलिक (वाशिम), राजेंद्र पाटणी (कारंजा), अशोक उईके (राळेगाव), मदन येरावार (यवतमाळ) असे भाजपचे चार आमदार या मतदारसंघात आहेत. मंत्री संजय राठोड (दिग्रस) हे गवळींच्या शिवसेनेचे एकमेव, तर इंद्रनील नाईक हे पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्याशी असलेला गवळींचा वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची किती मदत मिळेल हे सध्या तरी अधांतरी आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेच्या आधीच्या दोन व नंतरच्या तीन अशा पाच निवडणुकांमध्ये भावना गवळी विजयी झाल्या असल्या तरी गेल्या दोन निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेतही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मते त्यांना मिळालेली नाहीत. गवळी यांच्या आधी, त्यांचे वडील पुंडलिकराव गवळी यांचा अपवादवगळता वाशिम व यवतमाळ हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे बालेकिल्ले होते. त्याचमुळे २०१४ मध्ये तर अवघ्या १५ दिवसांच्या तयारीनेही ॲड. शिवाजीराव मोघे यांनी जोरदार टक्कर दिली होती.
आता भावना गवळी यांना घेरण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतही महायुतीप्रमाणेच जागावाटपाचा तिढा आहे. ही जागा काँग्रेसने लढवायची की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने हा पेच आघाडीला सोडवावा लागेल. गद्दारांना धडा शिकविण्यासाठी ही जागा शिवसेनाच लढवील, असा निर्धार मातोश्रीवरून व्यक्त करण्यात आला आहे. काँग्रेस तर तयारीत आहेच. शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे यांच्या शिवाय ऐन वेळेवर उच्चशिक्षित बंजारा उमेदवार रिंगणात येवू शकतो. मराठा व बंजारा बहूल मतदारसंघ असल्याने येथे उमेदवार ठरविताना त्याही बाजूने विचार केला जाणार आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ २०१९ | २०१४
विधानसभा मतदारसंघनिहाय मते : २०१९ :: मतदारसंघनिहाय मते : २०१४
भावना गवळी - माणिकराव ठाकरे : भावना गवळी - शिवाजीराव मोघे
- वाशिम - ९५,०७८ - ७१,०२१ : ८८,९९० - ६०,९६२
- कारंजा - ७१,०५६ - ६७,४२२ : ६४,८८९ - ६०,९२७
- राळेगाव - ९७,१७२ - ६८,९८० : ८३,२६८ - ५६,२१३
- यवतमाळ - १,०५,५१८ - ६८,२४१ : ८७,५४४ - ५९,१५६
- दिग्रस - ९५,३८१ - ७६,८३९ : ९४,४६९ - ६७,३७०
- पुसद - ७५,८९९ - ६९,९९४ : ५७,७७० - ७९,०११
टपाली मते - १९९४ - १६६२ : ९७५ - ४५०
एकूण - ५,४२,०९८ - ४,२४,१५९ : ४,७७,९०५ - ३,८४,०८९
२०१९च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण पवार यांनी ९४ हजार २२८ मते घेतली