पांढरकवडा नगरपरिषदेचे संख्याबळ १७ वरून १९
By admin | Published: January 17, 2015 11:07 PM2015-01-17T23:07:19+5:302015-01-17T23:07:19+5:30
नगरपरिषदेच्या वाढलेल्या हद्दीतून दोन नगरसेवक निवडून देण्याकरिता लवकरच निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे. त्यामुळे शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूकपूर्व
प्रवीण पिन्नमवार - पांढरकवडा
नगरपरिषदेच्या वाढलेल्या हद्दीतून दोन नगरसेवक निवडून देण्याकरिता लवकरच निवडणूक कार्यक्रम घोषित होणार आहे. त्यामुळे शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूकपूर्व काही बदलांचे वारेसुद्धा नगरपरिषदेत वाहू लागले आहे.
पांढरकवडा नगरपरिषदेची हद्द वाढ झाल्याने येथील १७ सदस्यीय सभागृहात आता दोन सदस्य वाढून १९ सदस्य होणार आहेत. नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्याने दोन सदस्यांकरिता लवकरच निवडणूक होणार आहे. वाढीव क्षेत्रातून दोन नगरसेवक निवडून देण्याकरिता चार सदस्य असलेल्या प्रभाग क्रमांक एक व दोनमध्ये एक सदस्य वाढविण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक एक व दोनमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी आरक्षण काढून निवडणूक होणार आहे.
सध्या येथील नगरपरिषदेत काँग्रेस व पारवेकर गटाची सत्ता आहे. सद्यस्थितीत नगरपरिषदेत १७ सदस्य संख्या आहे. त्यात काँग्रेस १३, पारवेकर गट दोन, तिवारी गट चार असे बलाबल आहेत. नगरपरिषदेची निवडणूक काँग्रेस व पारवेकर गटाने युती करून लढविली होती. त्यांना स्पष्ट बहुमत प्राप्त होऊन १७ पैकी १३ जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर नगराध्यक्षपदी शंकर बडे दोन वर्षांपूर्वी विराजमान झाले. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ येत्या जूनमध्ये संपणार आहे. त्यानंतर अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेकरिता राखीव आहे.
दरम्यान, लोकसभा व विधानसभा निवडणूक कार्यकाळात तालुक्यातील राजकारणात मोठे बदल झाले. अनेक दिग्गजांनी भाजपसोबत जाणे पसंत केल्याने तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. त्यामुळे आता दोन नगरसेवक जरी निवडून द्यायचे असले, तरी सर्वच राजकीय पक्ष ही निवडणूक प्रतिष्ठेची करणार असल्याचे दिसत आहे.
महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीपूर्वी काही नगरसेवक ‘चेंज’च्या मूडमध्ये दिसत आहे. त्यांनी आपल्या पद्धतीने वरिष्ठांकडे ‘लॉबिंग’ केल्याची चर्चा आहे. वरिष्ठ नेते मंडळी या ‘लॉबींग’ला किती महत्त्व देतात, हे येणारा काळच सांगणार आहे. एकूणच पुन्हा येथील नगरपरिषदेमध्ये राजकीय हालचाली दिसणार आहे, एवढे मात्र निश्चित. (शहर प्रतिनिधी)