‘प्रहार’ची जीवन प्राधिकरणावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 09:40 PM2019-06-06T21:40:47+5:302019-06-06T21:42:21+5:30
शहरातील वाघापूर परिसरात पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. यासाठी परिसरातील रस्ते व गल्ल्या ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. या कामात कुठलीही सुसूत्रता नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील वाघापूर परिसरात पहिल्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. यासाठी परिसरातील रस्ते व गल्ल्या ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. या कामात कुठलीही सुसूत्रता नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. हा प्रकार तत्काळ थांबवावा या मागणीसाठी प्रहार कार्यकर्त्यांनी जीवन प्राधिकरण कार्यालयावर गुरुवारी दुपारी धडक दिली.
पाण्याची टंचाई सर्वत्र भासत आहे. अशातच भूमिगत गटार योजनेच्या खोदकामामुळे वाघापूर परिसरातील नळ योजनेचे कनेक्शन ठिकठिकाणी तुटले आहे. यामुळे नळ येऊनही पाण्याचा अपव्यय होतो. खोदकामामुळे रस्त्यावर अक्षरश: चिखल झाला आहे व दैनंदिन वापरासाठी, पिण्यासाठी पाणी मिळत नाही. एक ना अनेक समस्या या कामामुळे निर्माण झाल्या आहेत. कंत्राटदार कंपनीकडून कुठलीच खबरदारी घेतली जात नाही. किमान काम करताना दिशादर्शक फलक लावणे अपेक्षित आहे. त्याचीही तसदी घेण्यात येत नाही. मनमानी पद्धतीने वाटेल तसे खोदकाम केले जात आहे. विकास कामे शहरासाठी आवश्यक आहे. मात्र त्याचे योग्य नियोजन व तंत्रशुद्ध पद्धतीने कामे होणे अपेक्षित आहे. अन्यथा प्रहारच्यावतीने जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या मागणीचे निवेदन जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. यावेळी प्रहारचे नगरसेवक नितीन मिर्झापुरे, शहर अध्यक्ष तुषार भोयर, शहर संघटक स्वप्नील उजवणे, गौरव गावंडे, हंसराज सोमवंशी, आकाश चिंचोळकर, अनिकेत कापसे, सुनील राऊत, उदय सरताबे, सौरभ पेलणे, सागर किनगावकर, अभिषेक शेंडे, प्रशिक मिसाळ, गौरव ढोणे आदी उपस्थित होते.