पांढरकवडा आगाराला समस्यांनी घेरले
By Admin | Published: January 16, 2016 02:44 AM2016-01-16T02:44:42+5:302016-01-16T02:44:42+5:30
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन विभागाच्या येथील आगारातील अंधाधुंद,...
सकाळची बस सायंकाळी : निम्म्या बस भंगार, आगार व्यवस्थापकांचे दुर्लक्ष कारणीभूत
पांढरकवडा : ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन विभागाच्या येथील आगारातील अंधाधुंद, भोंगळ व बेजबाबदार कारभारामुळे ‘बहुजन दुखाय, बहुजन सताय’ असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. या अंधाधुंद व भोंगळ कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय त्रस्त प्रवाशांनी घेतला आहे.
एस.टी.महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, आगार व्यवस्थापकांचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे या आगारातून बरेचदा वेळेवर बस सुटत नाही. सकाळची गाडी सायंकाळी सुटण्याचे प्रकार सर्रास घडत आहे. वेळेचे कोणतेही महत्त्व या आगाराला नाही. काही बसच्या फेऱ्यासुद्धा अचानक रद्द होतात. त्यामुळे प्रवाशांची अतिशय कुचंबणा होत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता बसफेरी अचानक रद्द होत असल्यामुळे प्रवाशांना बस स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागते. त्याचा लाभ अवैध प्रवासी वाहत्तुकदार घेत आहेत. अवैध प्रवासी वाहतुकदार आपल्या काळी-पिवळी, टेंपो ट्रॅक्स वाहनांमध्ये प्रवाशांना बसवून जीवघेणी वाहतूक करतात.
पांढरकवडा आगारात एकूण ६३ बस आहेत. त्यापैकी निम्म्यापेक्षा जादा बस आता भंगार झालेल्या आहेत. ११९ चालक व ११३ वाहक या आगारात कार्यरत आहेत. कित्येकवर्षापासून सुरू असलेल्या या जुनाट बस अद्याप तशाच धावत आहेत. या आगारातून दररोज एकूण १२५ फेऱ्या होतात. परंतु बहुतांश बस वेळेवर लागतच नाही. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ ताटकळत राहावे लागते. यातील अनेक टायमिंग वेळेवर रद्द होतात. जेव्हा लहर आली, तेव्हा या बस सोडल्या जात असल्याचे विचित्र दृश्य या आगारात पाहावयास मिळत आहे. मानव विकास मिशनच्या सात बस येथील आगारात आहे. बाहेरगावच्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्या-येण्यासाठी शासनाने या बस उपलब्ध करून दिल्या आहे. मात्र या बस बरेचदा प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जातात. प्रवाशांसाठी असलेल्या बस अनेकदा शाळेच्या विद्यार्थिनींसाठी वापरल्या जातात. त्यामुळे प्रवासी या बसमध्ये घेतले जात नाही. प्रवासी का घेत नाही, म्हणून प्रवाशांचे बरेचदा चालक व वाहकांसोबत वाद होतात. त्यात चालक वाहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. (तालुका प्रतिनिधी)