पांढरकवडा आगार समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:44 AM2021-08-26T04:44:38+5:302021-08-26T04:44:38+5:30
२० लालपरींची नितांत गरज,चालक वाहकांची अनेक पदे रिक्त पांढरकवडा : राज्य परिवहन महामंडळाचे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारे पांढरकवडा आगार ...
२० लालपरींची नितांत गरज,चालक वाहकांची अनेक पदे रिक्त
पांढरकवडा : राज्य परिवहन महामंडळाचे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारे पांढरकवडा आगार सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील १४१ गावातील प्रवाशांचा भार केवळ ५३ बसेसवर येऊन पडला आहे. यासोबतच येणाऱ्या अन्य अडचणीमुळे प्रवाशांना सेवा देताना पांढरकवडा आगाराला तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे.
तालुक्यात १४१ गावे आहेत. त्यापैकी जवळपास ९० गावांना एसटी बसवरच विसंबून राहावे लागते. शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी बसशिवाय पर्याय नाही. १९७४ ला पांढरकवडा आगाराची निर्मिती करण्यात आली, तर १९८४ ला नवीन बसस्थानक सुरू झाले. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढून प्रवाशांची संख्याही वाढत गेली. सध्याची प्रवाशांची संख्या लक्षात घेता, पुरेशा बसेस असणे आवश्यक आहे. परंतु आगारात केवळ ५३ बसेस आहेत. आगाराला नवीन २० लालपरींची नितांत गरज आहे. २० लालपरी आगाराला मिळाल्यास तसेच येथील रिक्त पदे भरल्यास येथील समस्या बऱ्याच अंशी सुटू शकणार आहे. गेल्या ५ वर्षात आगाराला केवळ एक नवीन बस मिळाली आहे. कित्येकदा लांब पल्याच्या अपुऱ्या बसेसमुळे आगाराला रद्द कराव्या लागत आहेत. पांढरकवडा आगारांतर्गत सध्या दिवसाकाठी ४५ शेड्युल सुरू असून त्या वाढवाव्या, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. येथे चालकांची १७४ पदे मंजूर असून १३९ पदे भरली आहे, तर ३५ पदे रिक्त आहेत. वाहकांची १७४ पदे मंजूर असून ९१ पदे भरली असून वाहकांची तब्बल ८३ पदे रिक्त आहेत. तसेच यांत्रिक कर्मचाऱ्यांची ३९ पदे मंजूर असून १२ पदे भरली आहेत, तर २७ पदे रिक्त आहेत. लिपिकाची ११ पदे मंजूर असून ८ पदे भरली आहे, तर तीन पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे येथील आगार प्रमुखाचे पद गेल्या काही वर्षांपासून प्रभारी असून सध्या येथील कार्यशाळा अधीक्षकाकडे येथील प्रभारी आगार प्रमुखाची जबाबदारी व चालक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्याचा कार्यभारसुद्धा दिल्याने एकच व्यक्ती तीन ठिकाणचा कार्यभार सांभाळत आहे. येथे कामाचा मोठा ताण पडत असल्याचे दिसून येत. बसेसची आणि कर्मचाऱ्यांची येथे कमतरता असल्याने अपेक्षित उत्पन्न येण्याससुद्धा अडचणी निर्माण होत आहे. पांढरकवडा आगारात १९ बसेस अशा आहेत की, ज्या बसेसने आतापर्यंत १० लाख किलोमीटरचे अंतर पार केले आहे. गेल्या ५ वर्षांपासून नवीन किमान २० लालपरींची या आगाराला प्रतीक्षा आहे. येथील बसस्थानक परिसरात पोलीस चौकीची मागणी आहे. परंतु या ठिकाणी पोलीस चौकीच्या बोर्डशिवाय येथे काहीच दिसत नाही. येथे घडणारे अपराध व चिडीमारीच्या घटना बघता २४ तास पोलीस हजर राहील, अशी पोलीस चौकीचीसुद्धा नितांत गरज निर्माण झाली आहे. अशा अनेक समस्यांच्या विळख्यात सध्या पांढरकवडा आगार सापडले आहे. बसेसची संख्या वाढली तरच प्रत्येक गावातील नागरिकांना वेळेवर बस उपलब्ध होऊ शकते व पांढरकवडा आगार समस्याच्या विळख्यातून बाहेर पडू शकते.
कोट : पांढरकवडा आगारातील रिक्त पदे तसेच बसेस मिळाल्यास येथील कामाचा ताण कमी होईल व आगाराचे उत्पन्न वाढीसाठी आणखी जोमाने काम करता येईल. योगेश देशमुख, प्रभारी आगार व्यवस्थापक, पांढरकवडा आगार.