‘लोकमत’ वार्ताहर पांडुरंग भोयरवर हल्ला
By admin | Published: April 4, 2017 12:02 AM2017-04-04T00:02:37+5:302017-04-04T00:02:37+5:30
नेर तालुक्यातील सोनखास येथील ‘लोकमत’चे वार्ताहर व वितरक पांडुरंग व्यंकटराव भोयर यांच्यावर सोमवारी एका इसमाने हल्ला करून मारहाण केली.
सोनखासची घटना : बातमी प्रसिद्ध केल्याचा रोष
यवतमाळ : नेर तालुक्यातील सोनखास येथील ‘लोकमत’चे वार्ताहर व वितरक पांडुरंग व्यंकटराव भोयर यांच्यावर सोमवारी एका इसमाने हल्ला करून मारहाण केली. या प्रकरणी लाडखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली.
पांडुरंग भोयर काही कामानिमित्ताने सोनखासच्या बसस्थानकावर आले होते. त्यावेळी आरोपी मुरलीधर नारायण ठाकरे याने अडवून आमच्याविरुद्ध बातमी प्रसिद्ध का केली, असे म्हणत मारहाण केली. गावातील नागरिकांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे मुरलीधर ठाकरे याच्या मुलाविरुद्ध वडगाव रोड ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा नोंदविला आहे. या संदर्भातील वृत्त यवतमाळ कार्यालयाने प्रसिद्ध केले होते. परंतु ही माहिती भोयर यांनीच दिल्याचा संशय घेऊन त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी लाडखेड ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (अॅट्रॉसिटी) इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वार्ताहरावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध होत असून आरोपीच्या अटकेची मागणी आहे.