उमरखेड तालुक्यात पैनगंगेचे वाळवंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:38 PM2017-12-01T23:38:17+5:302017-12-01T23:38:50+5:30
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाºया पैनगंगा नदी पात्राला वाळवंटाचे स्वरूप आले असून आगामी काळातील पाणी टंचाईची चाहूल लागली आहे.
ऑनलाईन लोकमत
उमरखेड : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाºया पैनगंगा नदी पात्राला वाळवंटाचे स्वरूप आले असून आगामी काळातील पाणी टंचाईची चाहूल लागली आहे. नदी पात्र कोरडे असल्याने तालुक्यातील ५० गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. दरवर्षी या भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते.
उमरखेड तालुक्याची जीवनदायी म्हणून पैनगंगेची ओळख आहे. परंतु अलिकडच्या काही वर्षात हिवाळ्यातच पैनगंगा कोरडी पडत आहे. त्यामुळे नदी तिरावरील पन्नास गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी भांबरखेडा, तिवरंग, हातला, दिवट, पिंपरी, नागापूर, बेलखेड, बारा, संगम चिंचोली, मार्लेगांव, निंबगव्हाण, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, कोपरा बोरी, मानकेश्वर, सावळेश्वर, सिंदगी, सोईट, ढाणकी, भोजनगर, बिटरगांव, खरबी, परोटीवन, बंदीटाकळी यासह अनेक गावात पाणी टंचाई जाणवत आहे.
यावर्षी डिसेंबर महिन्यात पैनगंगा कोरडी पडली असून नदीपात्रात पाण्याचे डबके साचले आहे. काही भागात तर वाळवंट झाले आहे. याच पैनगंगेच्या पात्रातून मोटारपंपाद्वारे ओलितासाठी पाणी घेतले जाते. मात्र यंदा पैनगंगा कोरडी पडल्याने ओलित ही धोक्यात आले आहे. पूर्वी बाराही महिने पैनगंगा खळखळून वाहत असायची परंत ुआता इसापूर धरणामुळे नदी हिवाळ्यातच कोरडी पडते.
पावसाळ्यात पुराचा फटका तर उन्हाळ्यात पाणी टंचाई असे समीकरण झाले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.
पाण्यासाठी भटकंती
पैनगंगा नदी कोरडी पडल्याने नदी तिरावरील विदर्भातील पन्नास आणि मराठवाड्यातील तीस गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. नदी तिरावर असलेल्या नळ योजनेच्या विहीरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे भविष्यात पाण्यासाठी हाहाकार उडणार आहे.