पैनगंगा अभयारण्य टाकणार कात
By Admin | Published: December 31, 2015 02:49 AM2015-12-31T02:49:14+5:302015-12-31T02:49:14+5:30
बाणगंगेचे (पैनगंगा) वरदान लाभलेले पैनगंगा अभयारण्य आता राष्ट्रीय नकाशावर येणार आहे.
राष्ट्रीय नकाशावर येणार : निसर्ग पर्यटन पथाची निर्मिती, नववर्षात होणार कार्यारंभ
राजाभाऊ बेदरकर उमरखेड
बाणगंगेचे (पैनगंगा) वरदान लाभलेले पैनगंगा अभयारण्य आता राष्ट्रीय नकाशावर येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत. निसर्गाने विविध वृक्षवेलींची मुक्तहस्ते उधळण केलेल्या अभयारण्यात नववर्षापासून निसर्गपर्यटन पथाचा शुभारंभ होणार आहे. निसर्ग पर्यटकांसाठी हा पथ एक नयनरम्य देणागी ठरणार आहे.
भारतातील इतर अभयारण्यांच्या पंक्तीत पैनगंगा बसविण्यासाठी वनप्रशासन कटिबद्ध झालेले आहे. प्रसिद्ध सहस्त्रकुंड (मुरली) या गावचा नैसर्गिक प्रपात आणि प्रारंभ होऊ घातलेल्या तब्बल ६२ किलोमीटर लांबीच्या निसर्ग पर्यटन पथनिर्मितीने हे अभयारण्य निसर्गप्रेमींसाठी वरदान ठरणार आहे. दक्षिण, पूर्व आणि उत्तर मार्गी वाहवत जाणारी पैनगंगा आपल्या पोटाशी सुपीक प्रदेश घेऊन या अभयारण्याचे वैभव व्दिगुणीत करत आहे.
जैवविविधतेने नटलेली वृक्षराजी वर्षभर वृक्षराजींना, पशुपक्ष्यांना होणारा पाण्याचा पुरवठा, गवताळ मैदानी परिसर, नीलगाय, चितळ, सांभर, चिंकारा, भेकड, अस्वल, काळविट, बिबटे, रानडुक्कर, लांडगे, तडस, कोल्हे, कोकड अशा विविध प्रकारच्या वन्यप्राण्यांमुळे या अभयारण्यात भविष्यात पर्यटन आणि अभ्यासाची पर्वणी उपलब्ध होणार आहे. जवळपास ४०० चौ. किलोमीटर क्षेत्राचे हे अभयारण्य दक्षीणेकडील एक राष्ट्रीय अभयारण्य म्हणून नावारुपास आणण्यासाठी वनविभागाची धडपड सुरू झाली आहे. निसर्ग पर्यटन पथनिर्मिती हा एक त्याचाच भाग आहे.
नांदेडपासून १५० व यवतमाळपासून १०० किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य विदर्भ-मराठवाड्याला जोडणारे एक उत्कृष्ट पर्यटनस्थळ राहणार आहे. पर्यटकांच्या वाढत्या ओघामुळे तालुक्याला एक आर्थिक उलाढालीचे बळ प्राप्त करूण देणार आहे. निसर्ग पर्यटन पथाचे उद्घाटन आमदार राजेंद्र नजरधने यांच्या हस्ते १ जानेवारी रोजी होणार आहे. सोबत प्रा. डॉ. वि.ना. कदम, अभयारण्याचे डीएफओ बी.पी. राठोड, सहायक वनसंरक्षक आर.एस. बोराडे, परीक्षेत्र अधिकारी दीपक पवार, एम.आर. आडे राहणार आहेत. निसर्ग पर्यटन पथाच्या शुभारंभ दिनी खासगी वाहनांसाठी सुट देण्यात आली आहे.