पांढरकवडा ठाणेदारांची उचलबांगडी
By admin | Published: June 5, 2014 12:02 AM2014-06-05T00:02:46+5:302014-06-05T00:02:46+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड घालून चार जुगार्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून जुगार साहित्यासह ८८ हजार ९५0
यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्डयावर धाड घालून चार जुगार्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून जुगार साहित्यासह ८८ हजार ९५0 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तडकाफडकी पांढरकवडाचे ठाणेदार अशोक बागूल यांची उचलबांगडी केली. तसेच त्यांना नियंत्रण कक्षात बसविण्यात आले.
शुभम अशोक राय रा. पांढरकवडा असे अटकेतील जुगार अड्डाचालकाचे तर शेख नासीर राज मोहम्मद, राज पोशदू नालमवार आणि अनिकेत बलवंतराव भोंगाडे तीघेही रा. पाटणबोरी अशी अटकेतील जुगार्यांची नावे आहे. पाटणबोरी येथे मोठा जुगारअड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या फौजदार आर. डी. वटाणे यांच्या नेतृत्वातील पथकाला मिळाली. त्यांनी पथकासह पाटणबोरी गाठून जुगार अड्डयावर धाड घातली. तसेच घटनास्थळाहून डावातील आणि जुगार्यांच्या झडतीत आढळलेली ७५ हजार ९५0 रूपये व चार मोबाईल असा एकूण ८८ हजार ९५0 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुरूवातीपासूनच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भूमिका अवैध दारू विक्री आणि जुगाराविरोधात राहीली आहे. प्रत्येक क्राईम मिटींगमध्ये ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे नियंत्रित करा, अन्यथा कारवाईला सामारे जा असा ईशारा त्यांच्याकडून ठाणेदारांना देण्यात येतो. मात्र पोलीस अधीक्षक शर्मा यांच्या या आदेशाकडे फारसे गांर्भीयाने न पहाता. ठाणेदार बागूल यांनी अवैध धंदे सुरूच ठेवले होते. यासंदर्भात पोलीस अधीक्षक स्तरावरच नव्हे तर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांच्याकडेही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापूर्वी जिल्हा महानिरीक्षक बिहारी जिल्हा दौर्यावर आले असताना ठाणेदार बागूल यांना बोलावून महानिरीक्षक बिहारी यांनी त्यांची अवैध धंदे नियंत्रित करण्यासाठी कानउघाडणी करीत समजही दिली होती.
त्यातच या कारवाईची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक शर्मा यांनी ठाणेदार बागुल यांना मेमो दिला. तसेच तडकाफडकी उचलबांगडी करून येथील नियंत्रित कक्षात बसविले. (स्थानिक प्रतिनिधी)