पोलीस ठाण्यातील भंगार डेंग्यूच्या डासांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 09:51 PM2017-07-29T21:51:47+5:302017-07-29T21:52:19+5:30
सर्वत्र स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरियाची साथ असताना पोलीस ठाण्यांच्या आवारातील भंगार साहित्य हे डेंग्यूच्या डासांचा अड्डा बनलेला असल्याचे
सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सर्वत्र स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरियाची साथ असताना पोलीस ठाण्यांच्या आवारातील भंगार साहित्य हे डेंग्यूच्या डासांचा अड्डा बनलेला असल्याचे खळबळजनक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या आॅन द स्पॉट रिपोर्टिंगमध्ये उघड झाले आहे. हे चित्र केवळ यवतमाळ शहर किंवा वडगाव रोड पोलीस ठाण्याचे नसून संपूर्ण जिल्ह्यात बहुतांश हीच स्थिती आहे. डेंग्यूच्या डासांनी चक्क पोलीस ठाण्यात आश्रय घेतल्याने अधिकारी, कर्मचारी व तेथे ये-जा असलेल्या फिर्यादी, साक्षीदार, पंच, जामीनदार यांचे आरोग्यही धोक्यात सापडले.
कोणत्याही पोलीस ठाण्यात भेट दिल्यास ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात जप्तीतील भंगार माल दृष्टीस पडतो. तेथील मोटरसायकली, वर्षभर न काढले जाणारे कुलर, दारुचे डबे, चारचाकी वाहने व त्यात साचलेले पाणी हे साथरोगाचे उत्पत्ती स्थळ बनले आहे. या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डास, अळ्या आदींचे वास्तव्य आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. कोर्ट-कचेरीचा मामला असल्याने हे भंगार निकाली काढण्यासाठी विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु हे दुर्लक्षच भविष्यात मानवी जीविताशी खेळ ठरू शकते. बहुतांश पोलीस ठाण्यात जप्तीतील मालाची अशीच स्थिती आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडेझुडूपे वाढली आहेत. त्यामुळे सरपटणाºया प्राण्यांचाही धोका संभवतो. मुंबई व उपनगर पोलीस ठाण्यात अशा प्रकारामुळे सर्व कर्मचाºयांनाच डेंग्यूची लागण झाल्याचे महानगरपालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले. त्यानंतरही पोलीस यंत्रणा सावध झालेली नाही. भंगार साहित्याची अशी स्थिती राज्य उत्पादन शुल्क, डाक कार्यालय परिसर व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये असण्याची शक्यता आहे. हिवताप निर्मूलन विभागाने आपल्या मोहिमेचा शुभारंभ खुद्द शासकीय कार्यालयापासूनच करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पालिकेकडून फॉगिंगचा केवळ सोपस्कार
ग्रामीण भागात आरोग्य संवर्धनासाठी विविध उपाययोजना व उपक्रम राबविले जातात. किटकजन्य आजार नियंत्रणासाठी हिवताप विभागाकडून स्वतंत्र मोहीम राबविली जाते. शहरात मात्र असा कोणताच उपक्रम राबविला जात नाही. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाला तुबंलेली गटारे स्वच्छ करण्यासाठी वेळ नाही. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारीनंतर नगपरिषद आरोग्य विभागाकडून केवळ फॉगिंंगचा सोपस्कार पार पाडला जातो. तोपर्यंत किटकजन्य आजार पसरलेला असतो. यातही जीवघेणा असलेल्या डेंग्यूपासून सुटका करून घेण्यासाठी नगरपरिषदेकडे कोणतीच यंत्रणा नाही. त्यामुळे शासकीय कार्यालयांतील डास उत्पत्तीतून शहरात किटकजन्य आजाराची साथ पसरण्याची भीती वर्तविली जात आहे.