यवतमाळात शिवसेनेला धक्का; जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांचाही पक्षाला 'जय महाराष्ट्र'
By विशाल सोनटक्के | Published: September 15, 2022 01:41 PM2022-09-15T13:41:42+5:302022-09-15T14:02:36+5:30
मागील काही दिवसांपासून पिंगळे पक्षाच्या कामापासून दूर होते. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वत:च्या वाहनावर असलेला शिवसेनेचा वाघसुद्धा काढून टाकला. त्यामुळेच पिंगळे शिवसेना सोडणार हे पक्के झाले होते.
यवतमाळ :शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांनी गुरुवारी सकाळी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला. वैयक्तिक कारणाने पद सोडत असून पुढील राजकीय वाटचालीबद्दल तूर्त कोणताही निर्णय घेतला नसल्याचे पिंगळे यांनी याबाबत जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
शिवसेनेतील बंडाळीनंतर आमदार संजय राठोड शिंदे गटात सामील झाले. राठोड यांचे निकटवर्तीय अशी पराग पिंगळे यांची ओळख होती. त्यामुळे पिंगळे हेही शिवसेना सोडतील, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, मागील दोन महिन्यांपासून ते सेनेतच कार्यरत हाेते.
राठोड यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनातही जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्यासोबत पिंगळे हेही सहभागी झाले होते. एवढेच नव्हे तर मातोश्रीवर झालेल्या बैठकीतही पिंगळे यांचा वेळोवेळी सहभाग होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पिंगळे पक्षाच्या कामापासून दूर होते. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वत:च्या वाहनावर असलेला शिवसेनेचा वाघसुद्धा काढून टाकला. त्यामुळेच पिंगळे शिवसेना सोडणार हे पक्के झाले होते.
राजकीय निर्णय घेताना पिंगळेंनी भाजपसोबत जायचे की शिंदे गटातील स्थानिक नेते संजय राठोड यांच्याशी पुन्हा जुळायचे, यावर अजून निर्णय झालेला नाही. दरम्यान, गौरी पूजनाच्याकाळात मंत्री संजय राठोड यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही पिंगळे यांच्या घरी भेट दिली. तेव्हापासूनच पिंगळे शिवसेनेबाहेर पडणार हे स्पष्ट झाले होते. आता पिंगळे यांच्यासोबत शिवसेनेतून त्यांचे किती समर्थक बाहेर पडतात, याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.