पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 09:05 PM2019-04-21T21:05:46+5:302019-04-21T21:07:56+5:30

शहरातील विविध सामाजिक चळवळींचे, मोर्चांचे केंद्र बनलेले समता मैदान (पोस्टल ग्राउंड) सध्या विविध अपप्रकारांच्या तावडीत सापडले आहे. सकाळ, संध्याकाळ या मैदानावर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची वर्दळ असते. तरीही सायंकाळच्या अंधारात येथे गैरप्रकार खुलेआम घडतात.

Parents, pay attention to kids | पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या

पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या

Next
ठळक मुद्देबंद गाडीत संशयास्पद धूम्रपान : ‘इव्हीनिंग वॉक’च्या नावाने अल्पवयीन जोडप्यांचे चाळे

रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील विविध सामाजिक चळवळींचे, मोर्चांचे केंद्र बनलेले समता मैदान (पोस्टल ग्राउंड) सध्या विविध अपप्रकारांच्या तावडीत सापडले आहे. सकाळ, संध्याकाळ या मैदानावर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची वर्दळ असते. तरीही सायंकाळच्या अंधारात येथे गैरप्रकार खुलेआम घडतात. गंभीर म्हणजे, यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. धुम्रपान आणि अश्लील चाळे सर्वांच्या समक्ष घडत असतानाही कोणी या मुलांना अवाक्षरानेही रोखत नाही. या मैदानाला लागूनच पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. भिंती पलीकडेच पोलीस यंत्रणा असतानाही बिनबोभाट गैरकृत्य घडतात. खुलेआम घडणाऱ्या या चाळ्यांबाबत मुलांच्या पालकांना मात्र कानोकान खबर कशी लागत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉकच्या आडून काही लांच्छनास्पद प्रकार मैदानामध्ये घडत आहे. खास करून सायंकाळच्या वेळेला अपप्रकार उघड-उघड सुरू असतो. अल्पवयीन विद्यार्थी आणि तरूण मुले या वेळेतील अंधाराचा गैरफायदा घेत आहेत. शिकवणीच्या नावाखाली दांडी मारून मैदानात तासन्तास गप्पा हाणतात. याची पालकांना खबरही नसते. शिकवणीचा वेळ संपताच हे विद्यार्थी गायब होतात.
इतक्यावरच हा प्रकार थांबत नाही. मैदानाच्या गॅलरीच्या वर, मागच्या बाजूला, चारचाकी वाहनांच्या गर्दीत आणि दुचाकी वाहनावर ही मंडळी बसलेली असते. खास करून बंद वाहनात ही मंडळी सिगारेट ओढताना पाहायला मिळते. यात अल्पवयीन मुलेही असतात. ही सिगार कुठल्या प्रकारची आहे, त्यासाठी छुप्या पद्धतीचा का अवलंब होतो, हा चिंतेचा विषय आहे.
अल्पवयीन, तरुण मुले-मुलींचे जोडपे रात्रीच्या वेळी या ठिकाणी अश्लिल चाळे करताना आढळते. सार्वजनिक ठिकाणी घडणारा हा प्रकार पाहूनही ‘इव्हिनिंग वॉक’ करणारी प्रौढ मंडळी या मुलांना चकार शब्दाने बोलू शकत नाही. काही वेळेस काही नागरिकांनी हा प्रकार रोखण्याचा प्रयत्न केला. तर प्रकरण हातापायीवर आले.
मैदानाच्या दुसऱ्या बाजूला पोलीस अधीक्षक कार्यालय आहे. त्यांचे कमांडोज रोडरोमियोंना हुसकावण्यासाठी सज्ज असतात. मात्र या मैदानाच्या आत जी गैरकृत्ये होतात, त्याकडे त्यांचे लक्ष नसते. या ठिकाणी फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळणारी मंडळी असते. त्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडतो. याकडे सारेच डोळेझाक करतात. यामुळे हा गैरप्रकार वाढला आहे.

शिकवणीच्या नावाने पालकांना चकमा
शिकवणी वर्गाला जाण्याचा किंवा खेळण्यासाठी जात असल्याचा बहाणा करून मुले या मैदानात येतात. मैदानातील कोपरा निवडून गैरप्रकार करतात. त्यामुळे पालकांना आपली मुले काय करतात, याची माहिती नसते. आपली मुले शिकवणीला गेली काय, याची माहिती पालकांनी दर आठवड्याला घेतली पाहिजे. तरच हा प्रकार रोखता येईल.

पालकांनो सातनंतर घराबाहेर पडा
समता मैदानच नव्हेतर शहरातील इतरही काही ठिकाणी असे अपप्रकार घडताना दिसतात. पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यालगतचा रस्ता, रिंग रोड, चौसाळा टेकडी, वसंत उद्यान या ठिकाणीही अश्लील चाळे करणारी अल्पवयीन जोडपी दिसतात. इतकेच नव्हेतर रहिवासी वस्त्यांमधील काही भागांमध्येही हा प्रकार दिसतो. यातून आपल्या मुलांना वाचवायचे असेल तर पालकांनी सायंकाळी सात वाजेच्या नंतर घराबाहेर पडावे, अशा ठिकाणांवर तपासणी करावी.

मोबाईलचा दुरुपयोग
या मैदानातील पायऱ्यांवर बसलेली तरुण मुले, शाळकरी मुले अंधारात मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाहतात. त्यामुळे एकतर पालकांनी मुलांकडे स्मार्ट फोन देऊ नये. दिलाच तर त्यात ते कुठल्या बाबी हाताळतात, याची रोज तपासणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Parents, pay attention to kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.