पालकांनो, तंबाखू सोडा, मुलांसाठी बचत करा

By admin | Published: August 17, 2016 01:08 AM2016-08-17T01:08:55+5:302016-08-17T01:08:55+5:30

शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यापूर्वी शाळेत कुणीही तंबाखू सेवन करीत नाही ना, याची खातरजमा करावी. नवीन पिढीला तंबाखूमुक्त निरोगी ...

Parents, quit smoking, save for kids | पालकांनो, तंबाखू सोडा, मुलांसाठी बचत करा

पालकांनो, तंबाखू सोडा, मुलांसाठी बचत करा

Next

संजय राठोड : ठिकठिकाणच्या ग्रामसभेत तंबाखूमुक्तीचा ठराव
यवतमाळ : शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यापूर्वी शाळेत कुणीही तंबाखू सेवन करीत नाही ना, याची खातरजमा करावी. नवीन पिढीला तंबाखूमुक्त निरोगी वातावरण देण्यासाठी शासन आणि प्रशासनाने एकत्र काम करणे आवश्यक आहे. पालकांनीही तंबाखू सेवनावर पैसे खर्च न करता मुलांसाठी बचत करावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी अर्जुना येथील कार्यक्रमात केले.
सत्तराव्या स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी झालेल्या ग्रामसभांमध्ये तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प घेण्यात आला. तसेच गावातील शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ न विकण्याचा ठरावही घेण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत अर्जुना येथे या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम पार पडला.
जिल्हा परिषद, अर्जुना ग्रामपंचायत, सलाम मुंबई फाऊंडेशन आणि बजाज इलेक्ट्रिकल्सच्या संयुक्त विद्यमाने अर्जुना ग्रामपंचायतीत तंबाखूमुक्त जीवनाचा संकल्प हा उपक्रम घेण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, उपसभापती नारायण राठोड, गटशिक्षणाधिकारी वासूदेव डायरे, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते. अर्जुना शाळेच्या विद्यार्थिनींनी पालकमंत्र्यांना राखी बांधून तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करण्याचे वचन घेतले.
येत्या बालदिनापर्यंत यवतमाळला देशातील पहिला तंबाखूमुक्त जिल्हा घोषित करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. तर शाळेच्या १०० यार्ड परिसरातील तंबाखूविक्रीवर कायदेशीर कारवाई करण्याची ग्वाही पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिली. खासदार गवळी म्हणाल्या, सीमेवर जवान आपल्या रक्षणासाठी प्राण पणाला लावत असतील तर आपण साधा तंबाखू का सोडू शकत नाही?
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त झालेल्या भित्तीचित्र स्पर्धेचा निकालही यावेळी जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलाम मुंबई फाऊंडेशनचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक अजय पिळणकर यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक चंद्रबोधी घायवटे व तालुका समन्वयक कैलास गव्हाणकर यांनी केले. तालुका समन्वयक नरेंद्र भांडारकर यांनी आभार मानले.
(स्थानिक प्रतिनिधी)

शाळांचा होणार गौरव
अर्जुना येथील सरपंच व्यवहारे आणि उपसरपंच सुरोशे यांनी तंबाखू सेवन न करण्याची आणि गावालाही तंबाखूमुक्त बनविण्याची शपथ घेतली. तंबाखूमुक्त झालेल्या हिवरी केंद्रातील शाळांना शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे आणि शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रके देण्यात आली. जिल्ह्यातील सर्वच तंबाखूमुक्त शाळांना डिसेंबर महिन्यात सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे काम सुरू आहे.

 

Web Title: Parents, quit smoking, save for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.