मुलांना पारखे वृद्ध आई-वडील ‘मेडिकल’मध्ये खितपत

By admin | Published: May 25, 2017 01:12 AM2017-05-25T01:12:53+5:302017-05-25T01:12:53+5:30

तरणी मुले आहेत. पण वय झालेल्या आई-बापांची सावलीही त्यांना नकोशी झाली.

Parsakara elderly parents and parents in 'Medical' | मुलांना पारखे वृद्ध आई-वडील ‘मेडिकल’मध्ये खितपत

मुलांना पारखे वृद्ध आई-वडील ‘मेडिकल’मध्ये खितपत

Next

नशिबी हालअपेष्टा : मुले कृतघ्न, पण मायबापाच्या मनात मायाच

सुरेंद्र राऊत
यवतमाळ : तरणी मुले आहेत. पण वय झालेल्या आई-बापांची सावलीही त्यांना नकोशी झाली. असे वृद्ध बेवारसासारखे यवतमाळच्या मेडिकल परिसरात येऊन आसरा शोधतात. त्यातले काही समाजसेवींच्या नजरेत आले तर उपचारही मिळतो. पण उपचारानंतर त्यांना कुठे पाठवावे हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अशा चार वृद्धांची ‘जिंदगी’ खितपत पडलेली आहे. पण हालअपेष्टा नशिबी येऊनही कृतघ्न मुलांविषयी चकार शब्दही ते बोलत नाहीत. अजूनही माया करणाऱ्या या मायबापांना फक्त त्यांच्या मुलांनी भेट दिली, तरी मनावरच्या जखमा भरू शकतात. त्यासाठीच ही कहाणी...
हेमराज हा ६९ वर्षीय वृद्ध नागपूरच्या लालगंज पोलीस चौकीजवळील भारतीवाडीतला मूळ रहिवासी. त्याला मूलबाळ नाही. पत्नी लिलाबाई १८ वर्षांपूर्वी दगावली आणि आबाळ सुरू झाली. भावाने त्याचे राहते घर बळकावून त्याला हाकलून दिले. तेव्हापासून तो यवतमाळात आहे. मिळेल ती रोजमजुरी करतो. गेल्या सात दिवसांपासून तो मेडिकल कॉलेज परिसरात तापाने पडून होता. त्याच्या पायाला मोठी जखम होती. अशाही परिस्थितीत तो भीक मागत नव्हता. रुग्णसेवी ओम चव्हाण यांनी विचारपूस करून खाऊ-पिऊ घातले. उचलून दवाखान्यात भरती केले. उजव्या पायाला ‘सेल्यूलाईटीस’ झाल्याचे निष्पन्न झाले. उपचार सुरू असून प्रकृती सुधारत आहे. या रूग्णाची अवस्था म्हणजे त्याला कपडेही नाही. काही समाजसेवी त्याच्यासाठी धडपड करीत आहे. डॉक्टर म्हणतात, याला सुट्टी देण्याची गरज आहे. पण जखम घेऊन तो वृद्धाश्रमात गेल्यास जखम चिघळण्याची शक्यता आहे. रोज ड्रेसिंग आवश्यक असून नर्स-डॉक्टर्स सेवा करीत आहे. हेमराज कोल्हे म्हणाले, ‘माही कोणाबद्दलही तक्रार नाही. इमानदारीने जगत आलो आता शेवटही इमानदारीनेच झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे.’
पोरायले काही करू नका!
नाना हे आर्णी तालुक्यातील कास्तकार. वय वर्षे ७०. पाच एकर शेतीचा मालक आणि चार तरुण पोरांचा पिता, हीदेखील त्यांची ओळख. पत्नी चार वर्षांपूर्वी मरण पावली. गावातच पडल्याने त्यांचा उजवा पाय मोडला आहे. महिनाभरापासून ते यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात बेवारस म्हणून उपचार घेत आहे. समाजसेवक भास्कर जळके, अविनाश जानकर देखभाल करीत आहे. पाय फ्रॅक्चर असून ट्रॅक्शन देऊन प्लास्टर करावे लागणार आहे. त्यांच्या पोरांशी संपर्काचा प्रयत्नही झाला. जवळा येथे रोजमजुरी करणाऱ्या मुलाने एकदा येऊन बापाची भेट घेतली. इतर दोन मुले घाटंजी तालुक्यातील पांगरीत भाड्याची शेती करतात. या शिवाय चौथा मुलगाही भेटायला आला नाही. एवढे असूनही वृद्ध नानांची पोरांबद्दल काही तक्रार नाही. विचारपूस करणाऱ्यांना ते सांगतात, ‘‘माह्या पोरायले काही करू नका.’’
मुलांच्या उपचारासाठी मागते भीक
शाहीन (४५) रा. आर्णी हिला मुलबाळ होत नव्हते म्हणून पहिल्या नवऱ्याने सोडले. तो शासकीय नोकरीत होता. नंतर मोलमजुरी करणाऱ्या इसमासोबत तिने दुसरे लग्न केले. त्याच्यापासून दोन मुलं झाली. ही मुले लहानपणापासून अस्थम्याने त्रस्त आहेत. शाहीन त्यांना यवतमाळच्या मेडिकलमध्ये नेहमी आणायची. वारंवारच्या फेरीमुळे रूग्णालयात तिच्या ओळखी वाढल्या. आता ती स्वत:च्या मुलांसोबत गावातले इतरही रूग्ण घेऊन येते. पोराच्या उपचारासाठी पैसे नसले तर भीक मागून उपचार करते. दोन-तीन वर्षाच्या पोराला बेंचला बांधून रूग्णालयात इकडे तिकडे फिरते. तिचे म्हणणे असे की, ‘पहिल्या लग्नात पोरं झाले असते तं सुखात राहिले असते. आता पोरं झाले. पण भीक मागा लागते.’
डॉक्टरवरच धावून जाते गंगूबाई
गंगूबाई (वय ८०) या नेर तालुक्यातील असून काहीशा विमनस्क आहेत. त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर आहे. मुले आहेत, पण मुलांबद्दल त्या कुठलीही माहिती सांगायला तयार नाही. त्या म्हणतात, ‘नाव कायले सांगू? माया पोराचंच काही कमी जास्त झालं तं मले माईत नाई.’ त्यांचा नातू प्रणय याने आजीजवळ थांबण्यासाठी वडलाकडून हजार रुपये घेतले. पण तो काही तिच्यासोबत रूग्णालयात थांबत नाही. कधीतरी एखादी चक्कर मारतो. गंगूबाई विमनस्क असल्याने डॉक्टर-नर्स यांनाही शिव्या देते. तिच्या पायाला बांधलेले प्लास्टरही तिने स्वत:च्या हाताने काढण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर समजावण्यास गेले तर अंगावर धावून येते. असे अनेक वृद्ध आता रूग्णालयात खितपत पडले आहेत.

या वृद्धांना पाठवायचे कुठे ?
४ठिकठिकाणाहून यवतमाळच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात असे निराधार वृद्ध रूग्ण येतात. त्यांच्यावर जमेल तसा उपचारही होतो. मात्र उपचारानंतर त्यांना पाठवायचे कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे. त्यांना रूग्णालयातच जास्त ठेवल्यास संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यासाठी यवतमाळात महिला आधार केंद्र, अनाथालय, वृद्धाश्रम यांची अत्यंत आवश्यकता आहे. या संस्था शासकीय यंत्रणेमार्फत चालविण्याची गरज आहे.
 

Web Title: Parsakara elderly parents and parents in 'Medical'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.