परसोडा ग्रामपंचायत ठरली तालुक्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:58+5:302021-05-09T04:42:58+5:30
आर्णी : तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत तालुक्यात अव्वल ठरली आहे. स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्काराने ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला. गावाचा सर्वांगीण ...
आर्णी : तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत तालुक्यात अव्वल ठरली आहे. स्मार्ट ग्राम प्रथम पुरस्काराने ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला.
गावाचा सर्वांगीण विकास करून गाव सुंदर बनविणे, हे प्रत्येक सरपंचाचे स्वप्न असते. मात्र, प्रयत्न, प्रचंड मेहनत आणि गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय कष्टाला फळ येत नाही. असाच अनुभव तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायतीला आला आहे. माजी सरपंच अतुल देशमुख व विद्यमान सरपंच प्रा. स्वप्ना अतुल देशमुख यांच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतीने अनेक विधायक व नावीन्यपूर्ण कामे केली. जिल्ह्यात नव्हे तर राज्यात नाव मिळविले.
पूर्वीच्या तालुका स्मार्ट ग्राम योजनेचे नाव दिवंगत आर.आर. पाटील यांनी ‘सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे केले. या योजनेसाठी २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधून मूल्यमापन समितीने तालुका सुंदर गावाची निवड केली. त्यात तालुक्यातून परसोडा गावाची निवड करण्यात आली. याब्द्दल सरपंच प्रा. स्वप्ना अतुल देशमुख यांचा गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी सत्कर केला. यावेळी पंचायत समिती सदस्य अनूप जाधव, भारत राठोड, उपसरपंच सुनंदा विनोद पत्रे, सचिव विजय राठोड, माजी सरपंच अतुल देशमुख, दत्ता हुलगुंडे उपस्थित होते.
बॉक्स
विविध योजना राबविल्या
गेल्या पाच वर्षांत परसोडा ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रातील प्रथम लाभार्थी होण्याचा बहुमान पटकाविला. गावकऱ्यांना आरओ प्लांटचे मोफत पाणी दिले. लोकसंख्येच्या दुप्पट वृक्षलागवड केली. प्रशस्त कार्यालय, मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा, व्यायामशाळा, निसर्गरम्य समशानभूमी, महिला बचत गटाकरिता स्वतंत्र कार्यालय आदी उपक्रम राबवून परसोडाने जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. सरपंच प्रा. स्वप्ना देशमुख यांनी हा पुरस्कार तीनदा सरपंच राहिलेल्या दिवंगत प्रकाश देशमुख यांना समर्पित केला.