डेहणी सिंचन प्रकल्प अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 10:28 PM2019-08-08T22:28:37+5:302019-08-08T22:29:06+5:30
आघाडी सरकारच्या काळात आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प डेहणी येथे साकारण्यात आला. आता या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील काम बाकी असून ते अर्धवट ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास येऊनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.
किशोर वंजारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : आघाडी सरकारच्या काळात आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प डेहणी येथे साकारण्यात आला. आता या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील काम बाकी असून ते अर्धवट ठेवले आहे. कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प पूर्णत्वास येऊनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.
नेर तालुक्यातील शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन करता यावे यासाठी उपसा सिंचन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. बेंबळा प्रकल्पाला पर्याय म्हणून डेहणी उपसा प्रकल्प काँग्रेसने मंजूर करून पूर्णत्वास आणला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संरक्षित सिंचनासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर ठिबक संच देण्याचा निर्णयही घेतला. मात्र नंतर सरकार बदलल्याने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले. १९९७ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प आता पूर्ण होऊनही केवळ जुजबी कारणांमुळे त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. कोट्यवधी रुपयांची यंत्रणा डेहणी येथे बेवारस पडलेली आहे. सिंचन विभागाचे अधिकारी याकडे फिरकून पाहात नाही. केवळ राजकीय वशीला असलेल्या शेतकºयांनाच या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जात आहे. उदात्त हेतू ठेऊन नेर तालुक्यातील चिखली, मांगलादेवी, धनज, ब्राह्मणवाडा, टाकळी, कुऱ्हेगाव यासह इतर गावांमध्ये सिंचनासाठी संरक्षित पाणी देण्यावर प्रयत्न करण्यात आले. मात्र अद्यापही प्रकल्पाचे पाणी पोहोचलेच नाही. दहा-बारा शेतकऱ्यांसाठी गावात टाकी बसविण्यात आली आहे. मात्र याचे नियंत्रण योग्य पद्धतीने होत नसल्याने पाण्याचा अपव्यय होतो व शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.
प्रकल्पाच्या कार्यालयात कोट्यवधी रुपयांची यंत्रसामुग्री बेवारस पडून आहे. याठिकाणी साधा चौकीदारही पहावयास मिळत नाही. ‘लोकमत’चा प्रतिनिधी याठिकाणी गेला असता येथे एकही अधिकारी, कर्मचारी उपस्थित नव्हता. डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाची यंत्रणा आता चोरट्यांचे धन बनली आहे. सरकार बदलल्यानंतर पूर्णत्वास आलेल्या प्रकल्पाचे काम थांबले आहे. शेतकरी हितात राजकारण आडवे येत असल्याचे दिसते.
सहा वर्षांपासून काम रखडले
डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाचा उद्देश पायदळी तुडविला जात आहे. शेतकºयांचे उत्पन्न वाढावे हा उद्देश ठेऊन काँग्रेस सरकारने हा प्रकल्प तयार केला. मात्र मागील सहा वर्षांपासून या प्रकल्पाचे काम अत्यंत संथगतीने चालू आहे. शेतकऱ्यांची मागणी असूनही पाणी दिले जात नाही. कितीतरी अपेक्षा ठेऊन हा प्रकल्प तयार झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निधीपण दिला. मात्र भ्रष्ट कारभाराने अजूनही पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले नाही, असे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंजाबराव खोडके यांनी सांगितले.