‘एसटी’ महामंडळात कारवाईमध्ये पक्षपात
By admin | Published: October 15, 2015 02:56 AM2015-10-15T02:56:11+5:302015-10-15T02:56:11+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात कामगारांवर कारवाईत पक्षपात होत असल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे.
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात कामगारांवर कारवाईत पक्षपात होत असल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. पाच जणांवर दोष सिद्ध झालेला असताना तिघांवर वेतनवाढ रोखण्याची, तर दोघांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. बनावट मोटर वॉरंट प्रकरणात झालेल्या या प्रकारामुळे चौकशी अधिकाऱ्यांची पोलखोल झाली असून त्यांच्यावर पदाचा दुरुपयोग करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सन २०१० मध्ये बनावट मोटर वॉरंट प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात नऊ वाहकांविरुद्ध अहवाल सादर झाला होता. पुढे या प्रकरणामध्ये पाच वाहकांवर कारवाई निश्चित करण्यात आली. यात जाधव, अंबाडरे, गझलवार, अरुण सानप आणि नवादीर खान यांचा समावेश होता. १२(ब) या कामगारांवर निश्चित झाले. वास्तविक सर्व कामगारांवर बनावट मोटर वॉरंट प्रकरणात सहभाग असल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. परंतु जाधव, अंबाडरे आणि गझलवार यांच्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली. अरुण सानप आणि नवादीर खान यांना मात्र बडतर्फ करण्यात आले.
सर्व पाचही कामगारांना एकाच प्रकारची शिक्षा अपेक्षित असताना वेगवेगळी शिक्षा करण्यात आली. ही बाब यातील काही कामगारांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीत पुढे आली. काही कामगारांनी तर आर्थिक व्यवहार करण्यास नकार दिल्याने कारवाईत पक्षपात करण्यात आल्याचा आरोप झाला होता. यवतमाळ विभागाचे तत्कालीन प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी दीपक इंगळे यांनी ही कारवाई निश्चित केली होती. मात्र कामगारांच्या तक्रारीवरून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी या संदर्भातील अहवाल मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मुंबई यांना ३० जुलै २०१५ रोजी सादर केला. यामध्ये दीपक इंगळे यांनी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या परिपत्रकातील निर्देशाचे उल्लंघन आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दीपक इंगळे हे सध्या यवतमाळ आगारात आगार व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कारवाईत पक्षपात होण्यास ते जबाबदार असल्याचे सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी स्पष्ट नमूद केले आहे.
माहितीच्या अधिकारात प्राप्त माहितीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. सदर प्रकरणातील वाहकांवर १२(ब) ही कलमे चौकशीअंती पूर्णपणे सिद्ध झाल्याचे इंगळे यांनी अंतिम निष्कर्षात नमूद केले आहे. यानंतरही त्यांनी सौम्य शिक्षा दिल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. (वार्ताहर)