उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला?
By admin | Published: February 23, 2017 12:58 AM2017-02-23T00:58:34+5:302017-02-23T00:58:34+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणातील सुमारे एक हजार १० उमेदवारांच्या
१०१० उमेदवार : जिल्हा परिषद, पंचायत समितीवर कुणाचा झेंडा फडकणार ?
यवतमाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणातील सुमारे एक हजार १० उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा उद्या गुरूवारी फैसला होणार आहे. दुपारी ४ वाजतापर्यंत मिनी मंत्रालयावर कुणाचा झेंडा फडकणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गामीण भागात निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
जिल्हा परिषदेचे ६१ गट आणि १६ पंचायत समितींच्या १२२ गणांसाठी १६ व २१ फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले. या दोन्ही टप्प्यांची मतमोजणी उद्या संबंधित तहसीलस्तरावर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी ३४९, तर पंचायत समितींच्या १२२ जागांसाठी ६६१ उमेदवार रिंगणात होते. या सर्वांच्या राजकीय भवितव्याचा उद्या फैसला होणार आहे.
विद्यमान जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी यावेळी भाजपा आणि शिवसेनेने जोरदार तयारी केली. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीपेक्षा भाजपा व शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपल्याचे निवडणुकीतील प्रचारावरून दिसून आले. शिवसेनेने तर भाजपाला आडवे करूनच जिल्हा परिषदेत पोहोचायचे, असा चंग बांधला होता. भाजपानेही जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी सर्व उपाय केले. ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी बहाल केली. या सर्व खेळींचा भाजपाला नेमका किती लाभ झाला, हे मतमोजणीअंती स्पष्ट होईल.
गुरूवारी दुपारी ४ वाजतापर्यंत सर्व निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तथापि जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघीडीची सत्ता पुन्हा स्थापन होईल, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. जिल्हा परिषदेतील बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांची सत्ता स्थापन व्हावी, असे मनोमन वाटत आहे. मात्र मतदार राजाने नेमका कोणता कौल दिला, हे अद्याप स्पष्ट नसल्याने सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे. (शहर प्रतिनिधी)
ढोलताशा, गुलाल उधळण्याला बंदी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीची एक फेरी केवळ १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. सर्व गट आणि गणांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. मात्र शेवटच्या फेरीनंतरच निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. तत्काळ निकाल जाहिर करण्यापेक्षा सर्वच निकाल एकाचवेळी जाहीर करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सरासरी १६ टेबल प्रत्येक ठिकाणी राहणार आहे. जिल्ह्यात २५६ टेबलवर ७८६ कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. पहिल्या फेरीला ३५ ते ४५ मिनीटे लागतील. तीन ते चार फेऱ्यानंतर मोजणीला गती येईल. नंतर १२ ते १५ मिनिटात फेरी पूर्ण होईल. त्यामुळे दुपारी ४ वाजतापर्यंत पूर्ण निकाल हाती येणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. ५०० मीटर परिसरात जमावाने गोळा होणे, ढोल वाजविणे, घोषणाबाजी करणे, गुलाल उधळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.