पक्षांच्या उमेदवार याद्या रखडल्या
By admin | Published: January 28, 2017 02:18 AM2017-01-28T02:18:44+5:302017-01-28T02:18:44+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा दिवस उजाडूनही सर्वच पक्षांच्या उमेदवारी याद्या रखडल्या आहेत.
जीव टांगणीला : बंडखोरी टाळण्यासाठी प्रयत्न
यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा दिवस उजाडूनही सर्वच पक्षांच्या उमेदवारी याद्या रखडल्या आहेत. कोणत्याच पक्षाने उमेदवारांची घोषणा केली नाही. त्यामुळे सर्वच पक्षांतील इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
सर्वच पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखतींचा सोपस्कार पूर्ण केला. जागा एक अन् इच्छुक अनेक, अशी सर्वच पक्षांची गत झाली आहे. यातून नेमकी उमेदवारी द्यावी कुणाला, असा पेच पक्षांपुढे उभा ठाकला आहे. त्यात उमेदवारी न मिळाल्यास उर्वरित इच्छुक नाराज होण्याचा धोका आहे. नेमकी हीच बाब पक्षांना सतावत आहे. परिणामी उमेदवारी घोषित करण्यास वेळ लागत आहे. भाजप-शिवसेनेची युती होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीत काही तालुक्यांत आघाडी होण्याची आशा अद्याप जिवंत आहे.
काँग्रेसची यादी मुंबईत पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत निश्चित होणार आहे. शुक्रवारी दुपारी मुंबईत प्रदेश संसदीय मंडळाची बैठक सुरू झाली. मात्र अद्याप यादीवर शिक्कामोर्तब झाले नाही.
घाटंजी व राळेगाव तालुक्यातील दोन गटांच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीत सध्या निवडणुकीचा जोश दिसून येत नाही. या पक्षाची यादी रखडली आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरूच आहे . त्यांची यादीही अद्याप निश्चित झाली नाही. (शहर प्रतिनिधी)