वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या भेटीसाठी पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 09:50 PM2018-11-28T21:50:17+5:302018-11-28T21:51:00+5:30
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक बदल केले जात आहे. आता येथे रुग्ण भेटण्यासाठी अधिकृत पास घेणे आवश्यक आहे. ठराविक वेळेतच रुग्णाला भेटता येणार आहे. केवळ एका व्यक्तीला रुग्णाजवळ थांबण्याची सवलत दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक बदल केले जात आहे. आता येथे रुग्ण भेटण्यासाठी अधिकृत पास घेणे आवश्यक आहे. ठराविक वेळेतच रुग्णाला भेटता येणार आहे. केवळ एका व्यक्तीला रुग्णाजवळ थांबण्याची सवलत दिली आहे. यामुळे गैरप्रकाराला आळा बसून वॉर्डातील स्वच्छता वाढली आहे.
मेडिकलमध्ये रुग्ण दाखल असला की त्याचे संपूर्ण कुटुंबच येथे मुक्कामाला येत होते. त्यामुळे रूग्णालयात सतत गर्दी असायची. भेटण्याची वेळ निश्चित नसल्याने रुग्णालाही आराम मिळत नव्हता. यावर उपाय म्हणून एका नातेवाईकाला रुग्णासोबत २४ तास राहण्याची मुभा दिली. तशी अधिकृत पास त्याला घ्यावी लागते. ही व्यक्ती कितीही वेळा वॉर्डातून आतबाहेर जाऊ शकतो. तर ठराविक वेळेत भेटण्यासाठी गुलाबी रंगाच्या दोन पास आहेत. या पासवर दुपाारी १२ ते २ आणि सायंकाळी ६.३० ते ८.३० याच वेळेत रुग्णांची भेट घेता येणार आहे. अतिदक्षात कक्षात (आयीसीसीयू) रुग्णालयात भेटण्यासाठी दुपारी ४ ते ६ ही वेळ निर्धारित केली आहे. यामुळे रुग्णांच्या भोवतालची गर्दी कमी झाली आहे. बरचेदा रुग्णांसोबतच त्याचे नातेवाईक जेवण करत होते. तिथेच झोपत होते यामुळे संसर्गाचा धोका वाढला होता. वॉर्डातील स्वच्छता धोक्यात आली होती. आता प्रत्येकाला वेळी ठरवून दिल्याने रुग्णालयीन कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी असून सेवा देताना येणाऱ्या अडचणी कमी झाल्याचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी सांगितले.
स्वतंत्र अपघात कक्ष
मेडिकलमध्ये अपघात कक्ष व बाह्यरुग्ण तपासणी विभाग एकत्र आहे. यावर एमसीआयने वारंवार आक्षेप घेतले आहे. त्यामुळे आता येथे लवकरच अद्ययावत असा अपघात कक्ष उभारण्यात येणार आहे. यासाठी रुग्णालय प्रशासानाने जागा निश्चित केली आहे. त्यामुळे बाह्यरूग्ण विभागातील गर्दी कमी होणार आहे.