पाटणबोरी ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर

By admin | Published: May 28, 2016 02:27 AM2016-05-28T02:27:58+5:302016-05-28T02:27:58+5:30

पांढरकवडा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाटणबोरीला विविध समस्यांनी ग्रासले आहे.

Patanbori gram panchayat away from development | पाटणबोरी ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर

पाटणबोरी ग्रामपंचायत विकासापासून कोसो दूर

Next

अतिक्रमणांचा विळखा : ग्रामसेवक-पदाधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांची दिशाभूल, गावात घाणीचे साम्राज्य
नीलेश यमसनवार पाटणबोरी
पांढरकवडा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाटणबोरीला विविध समस्यांनी ग्रासले आहे. गावात अतिक्रमणाचा सपाटा सुरू आहे. विकास कामांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गावात काही भागात घाणीचे साम्राज्य पसरले असून अनेक भागात नाल्या तुंबल्या आहेत. पथदिवेसुद्धा अनेकदा बंद राहात असल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.
पाटणबोरी ही पांढरकवडा तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. आठ महिन्यांपूर्वी निवडणूक झाली. त्यात नवीन सदस्य निवडून आले. आठ महिने लोटूनही गावातील विकास कामे रखडली आहे. येथील ग्रामपंचायतीला १४ वा वित्त आयोग, जिल्हा वार्षिक योजना, तसेच विविध योजनेतून सुमारे ३० लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला. त्यातून प्रथम पाणी टंचाई दूर करण्याकरिता काही ठिकाणी नवीन बोअर मारल्या, तर काही जुन्या बोअरवेलची दुरूस्ती केली. विविध भागात आठ टाकी लावण्याचे काम अद्याप सुरूच आहे.
या आठपैकी केवळ तीनच टाक्यांतून पाणी पुरवठा सुरू आहे. उर्वरित पाच टाक्या लावण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. ते उन्हाळा संपल्यानंतरच पूर्ण होणार का, असा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे. ग्रामपंचायतीला प्राप्त ३० लाखांच्या निधीतून १० लाख रूपये पाणी पुरवठ्याच्या कामात बोअरवेल मारणे, पाईपलाईन टाकणे, टाकीपर्यंत पाणी नेऊन त्याला नळ व तोट्या लावणे, यासाठी खर्च केले जात आहे. मात्र अद्याप ग्रामस्थांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. गावातील पाण्याच्या टाक्या शोभेच्या ठरत आहे. ग्रामपंचायतीने वाढीव पाणी पुरवठा योजनेकरिता विशेष कोणतेच प्रयत्न केले नाही. केवळ तात्पुरती मलमपट्टी करून पाणी टंचाई दूर करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे.
गावात खुनी नदीच्या पात्रात कोल्हापुरी बंधारा आहे. मात्र हा बंधारा अद्याप दुर्लक्षित आहे. या बंधाऱ्याला बॅरेजेस लावल्यास पाणी थांबून गावाच्या पाणी पातळीत वाढ होऊन जनावरांना, शेतीलासुद्धा पाणी मिळू शकते. मात्र ग्रामपंचायतीने त्या दृष्टीने कोणतेही नियोजन केले नाही. परिणामी पाणीटंचाई भीषण रूप धारण करीत आहे. ग्रामपंचायतीकडे उरलेल्या २० लाखांच्या निधीतून या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरूस्तीचे काम करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. खुनी नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडल्यानंतर तेच पाणी गावात पुरवठा केल्यास गावातील भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहू शकते. सध्या भूगर्भातील पाणी वापरामुळे गावातील अनेक भागातील बोअर आटत आहे. ग्रामस्थांना दुसरीकडून पाणी आणावे लागत आहे. महावीरनगर, बालाजीनगर, इंदिरानगर, प्रभाग क्रमांक तीनमधील पाण्याची पातळी खाली गेल्याने नागरिकांना ग्रामपंचायतीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
गावातील मुख्य रस्त्यांबाबतही ग्रामपंचायत उदासीन आहे. रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे ग्रामस्थ संतापले आहेत. रस्ते दुरूस्तीसाठी ग्रामपंचायत पाऊल उचलण्यासत यार नाही. आमदार राजू तोडसाम यांनी पाटणबोरी हे गाव दत्तक घेतले आहे. आमदार दत्तक गाव योजनेतून निधी मिळविण्यासाठीही उदासीनता दिसून येत आहे. हा निधी मिळवून गावातील मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण करणे शक्य आहे. त्यामुळे रस्त्यांची समस्या नेहमीसाठी निकाली निघू शकते. या रस्त्यावरील डांबर उखडल्याने रस्त्यावर केवळ खड्डेच खड्डे दिसत आहे. मात्र ग्रामपंचायत रस्ता दुरूस्तीतीसाठी पुढाकार घेण्यास तयार नाही. तालुक्यात मोटे गाव असून गावात साधे बसस्थानक नाही. ग्रामीण रूग्णालय नाही. नायब तहसीलदार कार्यालय नाही. गावात केवळ एकच राष्ट्रीयकृत बँक आहे. गावाचा विस्तार, क्षेत्रफळ व लोकसंख्येचा विचार करता येथे एका राष्ट्रीयकृत बँकेची आवश्यकता आहे.

Web Title: Patanbori gram panchayat away from development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.