४१ हजार शिक्षकांच्या चटोपाध्याय वेतनश्रेणीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:02 AM2018-11-14T11:02:45+5:302018-11-14T11:05:23+5:30
वरिष्ठ आणि निवडश्रेणीच्या प्रतीक्षेत असलेल्या ४१ हजार शिक्षकांना अखेर दिलासा मिळणार आहे. या चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणाचे लवकरच आयोजन केले जाणार आहे.
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वरिष्ठ आणि निवडश्रेणीच्या प्रतीक्षेत असलेल्या ४१ हजार शिक्षकांना अखेर दिलासा मिळणार आहे. या चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षणाचे लवकरच आयोजन केले जाणार आहे. गेल्या वर्षभरापासून प्रशिक्षण टाळणाऱ्या विद्या प्राधिकरणाला अखेर शिक्षकांच्या आंदोलनानंतरच जाग आली आहे.
सेवेची १२ व २४ वर्षे पूर्ण झाल्यावर शिक्षकांना अनुक्रमे वरिष्ठ व निवडश्रेणी लागू केली जाते. मात्र, २३ आॅक्टोबर २०१७ रोजी शासन निर्णय काढून तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांनी ही वेतनश्रेणी लागू करण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही बंधनकारक केले. ते प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी जबाबदारी महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे (विद्या प्राधिकरणाकडे) सोपविण्यात आली. मात्र, वर्ष लोटूनही प्रशिक्षणच आयोजित करण्यात आले नव्हते. शिक्षक महासंघ, शिक्षण संघर्ष संघटना, शिक्षक आघाडी अशा विविध संघटनांनी वारंवार आंदोलने केल्यावर आता विद्या प्राधिकरणाला जाग आली आहे.
ठराविक सेवा काळ पूर्ण केलेल्या राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची संख्या तब्बल ४१ हजार ६३६ एवढी मोठी आहे. त्यामुळे त्यांना जिल्हा स्तरावरच ५०-५० जणांची एक तुकडी करून प्रशिक्षण देण्याचा निर्णय विद्या प्राधिकरणाने घेतला आहे. त्यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेची (डायट) यंत्रणा वापरली जाणार आहे. तीन तुकड्यांसाठी एक प्रशिक्षण केंद्र आणि प्रत्येक तुकडीसाठी २ तज्ज्ञ मार्गदर्शक दिले जाणार आहे. प्रथम ५८० शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षित केले जाणार आहे. तर प्रत्येक केंद्रावर वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांमधून २९० केंद्र समन्वयकांची नियुक्ती होणार आहे.
प्रशिक्षणानंतरही ‘अ’श्रेणी अडविणार
२३ आॅक्टोबरच्या जीआरनुसार, चटोपाध्याय वेतनश्रेणी मिळविण्यासाठी संबंधित पात्र शिक्षकांची शाळा ही शाळासिद्धीच्या मूल्यांकनात ‘अ’ श्रेणीमध्ये असणे आवश्यक आहे. राज्यात आतापर्यंत फक्त एकदाच शाळासिद्धीचे बाह्यमूल्यांकन करण्यात आले आहे. त्यातही अत्यल्प शाळा अ श्रेणीत असून शासनाने आजपर्यंत एकाही शाळेला ‘अ’ श्रेणीचे प्रमाणपत्र बहाल केलेल नाही. त्यामुळे प्रशिक्षण घेतल्यावरही बहुतांश शिक्षकांची चटोपाध्याय वेतनश्रेणी अडण्याचीच शक्यता अधिक आहे.
वेतनश्रेणीसाठी पात्र विदर्भातील शिक्षक
चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी राज्यात ४१ हजार ६३६ प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पात्र आहेत. त्यात विदर्भातील १० हजार ५१७ शिक्षकांचा समावेश आहे. जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे : नागपूर २२७९, भंडारा ६७८, चंद्रपूर ११०४, गडचिरोली ३९८, गोंदिया ३१९, वर्धा ५२९, अकोला ८३८, अमरावती ११६७, बुलडाणा १३१७, वाशीम ५१९, यवतमाळ १३४९.