‘स्वातंत्र्या’च्या चित्रात सापडली ‘समते’ची वाट

By admin | Published: August 19, 2016 01:07 AM2016-08-19T01:07:11+5:302016-08-19T01:07:11+5:30

एक चिमुकली तिरंगा धरून पुढे सरसावली आहे.. तिच्या मागे दोन्ही पायांनी अपंग मुलगी धडपडतेय....

The path of 'Samata' found in the picture of 'freedom' | ‘स्वातंत्र्या’च्या चित्रात सापडली ‘समते’ची वाट

‘स्वातंत्र्या’च्या चित्रात सापडली ‘समते’ची वाट

Next

बघा एका फोटोची किमया : पाच बहिणींना मिळाला समाजाच्या मदतीचा हात
यवतमाळ : एक चिमुकली तिरंगा धरून पुढे सरसावली आहे.. तिच्या मागे दोन्ही पायांनी अपंग मुलगी धडपडतेय.... तिला आणखी एक विद्यार्थी आधार देतोय... हे दृश्य सत्तराव्या स्वातंत्र्यदिनी ‘लोकमत’ने प्रकाशित केले अन् लोकशक्ती फोटोतील त्या अपंग मुलीचा शोध घेत तिच्या घरापर्यंत पोहोचली. तिच्या घरातले अभावग्रस्त जिणे पाहून ‘लोक’मत गहिवरले. मदतीसाठी अनेक जण सरसावले. झोपडीतल्या पाचही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारांनी लोकांनी स्वीकारली... ही किमया घडली केवळ एका छायाचित्रामुळे !
छायाचित्रातून उलगडत गेलेली अन् समाजाची माया मिळविलेली ही कहाणी यवतमाळजवळच्या बोदड गावातली. छायाचित्रणाचे मोल अधोरेखित करणारा हा प्रकार जागतिक छायाचित्रदिनीच उजेडात यावा, हाही योगायोगच.
वाघापूर आणि लोहारा ग्रामपंचायतीच्या मध्यभागी वसलेले बोदड गाव चौसाळा मार्गावर येते. शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात फुकटनगर ही अतिक्रमित वस्ती आहे. याच ठिकाणी पारधी कुटुंब वास्तव्याला आहे. रोजमजुरी करून ते पोट भरते. १५ आॅगस्टला ध्वजारोहणासाठी जाणारी अपंग रविना आणि तिची शिक्षणाची जिद्द असा फोटो छायाचित्रकार मनोज कटकतलवारे यांनी टिपला होता. ‘लोकमत’ने तो पहिल्या पानावर प्रसिद्ध केला.
बोदडमधील फुकटनगरात एका पडप्याच्या खोलीत पारधी कुटुंबातील ५ मुली आणि पती-पत्नी असे सात सदस्य राहातात. हे झोपडेही पडण्याच्याच अवस्थेत आहे. राजू पारधी यांना ५ मुली आहेत. एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाला. रोजमजुरीवर सात जणांचे कुटुंब चालविणे अवघड. यामुळे संगीता नावाच्या मुलीने नववीपासूनच शिक्षण सोडले. ती धुणी-भांडी आणि वीटभट्टीवर काम करुन आईवडिलांना मदत करते. विशेष म्हणजे, रविनाला शाळेत पोहोचविणे आणि घरी आणण्यासाठी तीच मदत करते. रविना पाचव्या वर्गात आहे. ती दोन्ही पायांनी अपंग आहे. यामुळे तिला शाळेत जाता येत नाही. पण शिक्षणाची आवड आहे. हुशार असल्याने तिला शाळेत पाठविले जाते. परंतु पुढील काळात शिक्षण झेपावणार नाही, अशीच अवस्था आहे. पुष्पा ही सर्वात मोठी मुलगी आहे. ती बारावीमध्ये पीपल स्कूलमध्ये कॉमर्सचे शिक्षण घेत आहे. तिची शाळा फार दूर आहे. घरचे सर्व काम आटोपून तिला कॉलेजला जाव लागते. विशेष म्हणजे तिला दहावीमध्ये ६८ टक्के गुण मिळाले आहेत. तिला पुढचे शिक्षण घ्यायचे आहे. मात्र परिस्थिती हलाखीची असल्याने पुष्पा चिंतेत आहे. नंदना सहाव्या वर्गात आहे. तर सहयोगीता चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहे.
‘लोकमत’च्या छायाचित्राची दखल घेत लोहारा आणि वाघापूरच्या जागृत नागरिकांनी फुकटनगरातील पारधी यांचे घर गाठले. त्यांनी रविनाच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. यासोबतच कपडे आणि आरोग्याच्या प्रश्नावरही ही मंडळी संपूर्ण लक्ष देणार आहे. संगीताला पुन्हा शाळेत टाकण्यासोबत पुष्पाच्या शिक्षणासाठी मदत केली जाणार आहे. पुष्पाची शाळा दूर असल्याने तिला सायकल मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाघापूरचे माजी सरपंच संजय कोल्हे, लोहाराचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप फरकाडे, लोहाराच्या माजी सदस्या लिला बनसोड, वाघापूरचे माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश भगत, शिवसेनेच कार्यकर्ते सुनील सानप, अशोक रामटेके आणि प्रमोद पंडितकर यांनी पारधी कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. (शहर वार्ताहर)

आजी गहिवरल्या, रविनाने दिले फुल
लोहारा-वाघापुरातील लोकांनी मदतीचा हात पुढे करताच आजीच्या डोळ्याला धारा लागल्या. त्यांनी पारधी कुटुंबाला देत असलेल्या मदतीबाबत सर्वांचे आभार मानले. तर अपंग रविनाने तिच्या बागेतील फुल मदत करणाऱ्या दात्यांना दिले.

 

Web Title: The path of 'Samata' found in the picture of 'freedom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.