शिवणकलेतून दाखविला आत्मनिर्भरतेचा मार्ग
By admin | Published: July 10, 2017 01:06 AM2017-07-10T01:06:18+5:302017-07-10T01:06:18+5:30
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या येथील रामकिसन सारडा चॅरिटेबल ट्रस्टने महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.
सारडा ट्रस्टचा पुढाकार : उमरखेडमधील गरीब महिलांना मोफत प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या येथील रामकिसन सारडा चॅरिटेबल ट्रस्टने महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. तब्बल २५ गरीब महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर केले आहे.
उमरखेड येथील सारडा ट्रस्टचे संचालक पुरुषोत्तम सारडा दरवर्षी लोकोपयोगी उपक्रम राबवितात. वृक्ष संवर्धन आणि संगोपनाचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. शेकडो वृक्ष लावून त्यांचे स्वखर्चाने जतन केले आहे. त्यांना परिसरात वृक्षमित्र म्हणूनच ओळखले जाते. आता या सारडा ट्रस्टने महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. गोरगरीब महिलांना आपल्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्यांना शिवणकला प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यावर्षी त्यांनी २५ गरीब होतकरू महिलांना जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत २५० रुपये विद्यावेतन देवून शिवणकलेचे संपूर्ण प्रशिक्षण मोफत दिले.
या प्रशिक्षणाची सांगता नगराध्यक्ष नामदेव ससाने व त्यांच्या पत्नी अनुजा ससाने यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी राजस्थानी मंडळाच्या अध्यक्ष साधना बाहेती, नारायणदास भट्टड, जेठमलजी बंग उपस्थित होते. प्रशिक्षित महिलांमधून ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात अनुसया पराते या महिलेला शिवणयंत्र मिळाले. पुरुषोत्तम सारडा यांच्या हस्ते त्यांना शिवणयंत्र देण्यात आले.
संचालन दीपा सारडा यांनी केले. कार्यक्रमाला सारडा ट्रस्ट आणि राजस्थानी महिला महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार ओम सारडा यांनी मानले. समाजोपयोगी कार्यात अग्रेसर असलेल्या या ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.