महिला सरपंचाच्या पतीराजाला आता ग्रामपंचायतीत ‘नो एन्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 05:00 AM2021-08-01T05:00:00+5:302021-08-01T05:00:42+5:30
सरपंच गावाचा प्रथम नागरिक असल्याने त्याचा वेगळाच तोरा असतो. महिला सरपंच सक्षम असतानाही, अनेक पतीराज किंवा नातेवाईक कामात हस्तक्षेप करीत कारभार करतात. त्यामुळे शासनाने सरपंचाच्या पती व नातेवाइकाला कार्यालयातच येण्यास बंदी केली आहे. तसेच कामात हस्तक्षेप आढळून आल्यास थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
परिमल डोहणे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पत्नी सरपंच असली तर पती तिच्या कामात लुडबूड करीत असल्याचे अनेकदा बघायला मिळते. परंतु, आता पती किंवा नातेवाईक हस्तक्षेप करताना आढळून आल्यास थेट कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे पडद्यामागून काम करणाऱ्या सरपंच पतीला चाप बसणार आहे.
सरपंच गावाचा प्रथम नागरिक असल्याने त्याचा वेगळाच तोरा असतो. महिला सरपंच सक्षम असतानाही, अनेक पतीराज किंवा नातेवाईक कामात हस्तक्षेप करीत कारभार करतात. त्यामुळे शासनाने सरपंचाच्या पती व नातेवाइकाला कार्यालयातच येण्यास बंदी केली आहे. तसेच कामात हस्तक्षेप आढळून आल्यास थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला सरपंच म्हणतात...
मी या निर्णयाचे स्वागत करते. अनेक महिला सरपंचांमध्ये नेतृत्वगुण असूनही त्या महिला सरपंचांना केवळ समाजाचा आणि पतीचा मान राखण्यासाठी नाइलाजास्तव‘सहीबाई’ म्हणून काम करावे लागते. खरे तर हा निर्णय यापूर्वीच व्हायला हवा होता. पुरुषी संस्कृतीला चाप बसून अनेक महिलांनी आपले नेतृत्व सिद्ध केले असते.
- ॲड. शर्मिला रामटेके,
सरपंच नवेगाव पांडव, ता. नागभीड
नवराच कारभारी...
बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणामुळे महिलांना सरपंच होण्याचा मान मिळतो. त्यावेळी अपवादात्मक ग्रामपंचायतीमध्ये महिला पतीचा हस्तक्षेप असतो. परंतु, आज महिलाही ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यास सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असून त्या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यास सक्षम होत आहेत, ही समाधानाची बाब आहे.
- अनेकश्वर मेश्राम,
उपसरपंच, विसापूर