पैनगंगेच्या पात्रात मटका व जुगार अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 10:33 PM2018-05-05T22:33:08+5:302018-05-05T22:33:08+5:30
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या धनोडा येथील पैनगंगेच्या पात्रात मटका व जुगाराचे अड्डे खुलेआम सुरु आहे. याठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याबाबत गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या धनोडा येथील पैनगंगेच्या पात्रात मटका व जुगाराचे अड्डे खुलेआम सुरु आहे. याठिकाणी दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याबाबत गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
धनोडा येथे उत्तरवाहिनी पैनगंगा आहे. या परिसरात विविध मंदिरे आहेत. तसेच नदी तीरावर स्मशान भूमी आहे. धनोडा येथील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले बुढेबाबा मंदिर आहे. याच परिसरात हा खुलेआम प्रकार सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे. परंतु कुणीही कारवाई करीत नाही. महागाव पोलिसांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आर्थिक पाट वाहत असल्याने कारवाई होत नाही असा अनुभव गावकऱ्यांना आहे.
विशेष म्हणजे गावकऱ्यांनी लोकवर्गणीत दहा लाख रुपये खर्च करून बुढेबाबा मंदिराचे भव्यसभागृह उभारले. परंतु आता तेथे मटका आणि जुगाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे या मंदिरात महिलांनाही जाता येत नाही. तसेच उत्तरवाहिनी पैनगंगात आंघोळीसाठी जाणाºया भाविक विशेषत: महिला भाविकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेलेल्या अनेकांकडे लाखो रुपये आहे. त्यातील काही जण याठिकाणी जुगार खेळतांना व मटका लावताना दिसून येतात.
शौकिनांना सर्व सुविधा जागेवरच
याठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्यातील शौकिन मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन येतात. त्यांना सर्व सुविधा जागेवरच उपलब्ध करून दिले जाते. थंडगार पाणी, चहा, नास्ता आणि आवडीनिवडी पुरविल्या जातात. याठिकाणी दो लॅपटॉप आणि मोबाईलवरून मटका घेतला जातो. हा प्रकार खुलेआम असला तरी कारवाई मात्र होत नाही.