‘पवित्र’ पोर्टल हलेना अन् झेडपीने काढली कंत्राटी भरती; यवतमाळ जिल्ह्यात भरणार ४८४ शिक्षण स्वयंसेवक
By अविनाश साबापुरे | Published: August 25, 2023 07:08 PM2023-08-25T19:08:20+5:302023-08-25T19:08:33+5:30
अवघे साडेसात हजारांचे मानधन अन् शंभर रुपयांचा स्टॅम्प
यवतमाळ : जिल्ह्यासह राज्यभरातील डीएड, बीएडधारक अभियोग्यता परीक्षा देऊन पवित्र पोर्टलद्वारे कायम स्वरुपी शिक्षक भरती होण्याची वाट पाहात आहेत. अशावेळी जिल्हा परिषदेने मात्र ४८४ कंत्राटी शिक्षक भरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सीईओ डाॅ. मैनाक घोष यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना गुरुवारी लेखी आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा खनिकर्म योजनेतून प्राथमिक शिक्षकांची ४१४ आणि माध्यमिक शिक्षकांची ७० अशी ४८४ पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात शिक्षकांची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही तात्पुरत्या स्वरुपातील भरती करणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या शिक्षक स्वयंसेवकांना केवळ २०२३-२४ या सत्रात ८९ दिवसांकरिता नियुक्ती दिली जाणार आहे. शिवाय नवीन कायमस्वरुपी शिक्षकाची नियुक्ती झाल्यास या सेवकांची नियुक्ती आपोआपच संपुष्टात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कंत्राटावर नेमण्यात येणाऱ्या उमेदवारांकडे संपूर्ण शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असावी, तसेच प्राथमिकच्या पदांसाठी त्यांनी टीईटी परीक्षाही उत्तीर्ण केलेली असावी, अशी अट घालण्यात आली आहे. मात्र या उच्च शिक्षित उमेदवारांना केवळ ७ हजार ५०० रुपयांचे मासिक मानधन दिले जाणार आहे. राज्य शासनाकडून कायमस्वरुपी भरतीला टाळाटाळ केली जात असून तुटपुंजा मानधनावर उच्च पात्रताधारकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जात असल्याबाबत बेरोजगारांतून संताप व्यक्त होत आहे. त्यातच अशा शिक्षक स्वयंसेवकांकडून कंत्राटी नियुक्ती कधीही रद्द होऊ शकेल अशा अनुषंगाने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्रही भरून घेण्याचे आदेश आहेत. त्यामुळे एकीकडे नोकरी देण्याचे गाजर दाखवायचे आणि दुसरीकडे बेरोजगारांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार सुरू असल्याची खंतही बेरोजगारांनी व्यक्त केली. त्यातही महत्त्वाचे, जिल्ह्यात जवळपास दीड हजार जागा रिक्त असताना केवळ ४८४ जागाच कंत्राटावर का भरल्या जात आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. खरेच विद्यार्थी हित जपायचे असेल तर सर्व रिक्त जागा भराव्या, अशी मागणी होत आहे.
कोणत्या तालुक्यात किती जागा भरणार
तालुका : जागा
आर्णी : २४
बाभूळगाव : १३
दारव्हा : २०
दिग्रस : २०
कळंब : १६
महागाव : ३१
घाटंजी : २७
पुसद : ४६
राळेगाव : २६
उमरखेड : ५७
नेर : २०
पांढरकवडा : १२
यवतमाळ : २६
वणी : ३०
मारेगाव : १५
झरी जामणी : ३१
माध्यमिक : ७०
एकूण : ४८४
मध्यंतरी वणी, झरी व मारेगाव तालुक्यात आपण ९३ शिक्षक स्वयंसेवक कंत्राटावर नेमले. आता संचमान्यतेनुसार जिथे रिक्त जागा आहेत, तिथे खनिज निधीतून ४८४ शिक्षक स्वयंसेवक नेमण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यानंतरही ज्या रिक्त जागा असतील तेथे शासन निर्देशाप्रमाणे सेवानिवृत्तांची नेमणूक होईल. त्याकरिता आपल्याकडे १०९ सेवानिवृत्तांचे अर्ज आले आहेत. - किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी, यवतमाळ