‘मेडिकल’चा बालरुग्ण विभाग वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:26 PM2018-01-06T23:26:33+5:302018-01-06T23:26:49+5:30
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरुग्ण विभागात मोठी अनागोंदी सुरू आहे. कनिष्ठ डॉक्टरांच्या भरवशावरच इथला कारभार आहे. त्यातही बोटावर मोजण्याइतकेच डॉक्टर येथे प्रामाणिकपणे सेवा देतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरुग्ण विभागात मोठी अनागोंदी सुरू आहे. कनिष्ठ डॉक्टरांच्या भरवशावरच इथला कारभार आहे. त्यातही बोटावर मोजण्याइतकेच डॉक्टर येथे प्रामाणिकपणे सेवा देतात. बाकीचे आलेल्या रुग्णांना असभ्य भाषेत बोलून येथून हुसकावून लावण्याचाच प्रयत्न करत आहे. यामुळे याठिकाणी बालमृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येते.
बाल रुग्ण विभागात शनिवारी पहाटे अकबर वसीम खान (वय २ वर्षे) रा.नबाबपूरा कळंब चौक या बालकाचा मृत्यू झाला. हा बालक आठ दिवसांपासून येथे उपचार घेत होता. रात्री अचानक तो मोठ्याने खोकलायला लागला. मात्र यावेळी वॉर्डात कोणीच उपलब्ध नव्हते. धावपळ करून डॉक्टरांना बोलाविण्यात आले. इन्चार्ज नर्स खोली कुलुपबंद करून झोपी गेली. त्यामुळे काही वेळ आलेल्या डॉक्टरची तारांबळ झाली. शेवटी नर्सला उठवून चाबी घेत औषधांचा साठा असलेली खोली उघडण्यात आली. तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या विभागात मागील काही दिवसांपासून अनागोंदी असून केवळ कनिष्ठ डॉक्टरांवरच उपचाराची यंत्रणा अवलंबून आहे. सलमा शेख (२०) रा.सावनेर ही महिला आपल्या मुलीला घेऊन शुक्रवारी रात्री ११ वाजता रुग्णालयात आली. बाल रुग्ण विभागात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने असभ्य शब्दांचा वापर करत एवढ्या रात्री कशाला आली म्हणून हेळसांड केली. ही आपबीती सलमा शेख या महिलेने सांगितली. याशिवाय अंकुश प्रभूसिंग पवार हा मागील ११ दिवसांपासून आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात आहे. मोईन शेख, सैयद असलीम सैयद अलीना (रा.कळंब), जयश्री राठोड (रा.कोसदनी), शे. सुफियाना शे. फारूख (रा.डेहनकर ले-आऊट) या मुलांच्या पालकांनाही बाल रोग विभागात अतिशय कटू अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.
बाल रोग विभागात रुग्ण दाखल झाल्यानंतर तो स्वत:हून कसा पळून जाईल, अशी व्यवस्था येथील यंत्रणेकडून निर्माण करण्यात आली. अर्थात या विभागात काही कर्तव्यदक्ष व मनमिळाऊ डॉक्टर आणि नर्सचाही स्टाफ असल्याचे सांगण्यात आले. मात्र यांच्या मर्यादा येत असून कामचुकारांकडून सातत्याने हेळसांडच केली जाते. आर्थिक परिस्थिती नसल्याने शासकीय रुग्णालयात येण्याशिवाय पर्याय नाही. अनेक दाम्पत्य रोजमजुरी सोडून १०-१५ दिवसांपासून मुलाजवळ आहे. अशास्थितीत घरी असलेल्या मुलांचा उदरनिर्वाह आणि उपचारासाठीचा पैसा कोठून आणायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. येथे डॉक्टर उडवाउडवी करून केवळ वेळ मारून नेत असल्याचे सांगण्यात आले.
शासकीय रुग्णालयात सहज दृष्टीपथास येईल असे फेरबदल प्रभारी अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार यांनी केले आहे. मात्र रुग्णालयातील अंतर्गत यंत्रणा अजूनही सुस्तावलेलीच आहे. वरकरणीचा भपकेबाजपणा कमी करून खºया अर्थाने रुग्णांना न्याय मिळवून देण्याची गरज आहे.