शिल्लक तूर खरेदीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 01:00 AM2017-07-24T01:00:45+5:302017-07-24T01:00:45+5:30
३१ जुलैपर्यंत शिल्लक राहिलेल्या तुरीची खरेदी करण्याचे निर्देश सहकार विभागाने दिले.
सव्वालाख क्विंटल : यंत्रणेपुढे मोजमापाचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ३१ जुलैपर्यंत शिल्लक राहिलेल्या तुरीची खरेदी करण्याचे निर्देश सहकार विभागाने दिले. यामुळे येत्या आठ दिवसांत तब्बल सव्वलाख क्विंटल तुरीच्या मोजमापाचे आव्हान यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे.
राज्य शासनाने हमी दरानुसार तुरीची खरेदी केली. ३१ मे रोजी खरेदी बबंद झाली. मात्र जिल्ह्यातील संकलन केंद्रांवर मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक राहिली. त्याची टोकन पद्धतीने नोंद घेण्यात आली. नोंद घेतलेली तूर शेतकऱ्यांच्या घरी आहे किंवा नाही, याचे सर्वेक्षण केले गेले. त्यात सव्वा लाख क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरी पडून असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार आता ही तूर खरेदी करण्याचे आदेश धडकले आहे.
सहकार विभागाने दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनंतर्गत ही तूर खरेदी केली जाणार आहे. मात्र खरेदीसाठी अनेक जाचक अटीही आहेत. ३१ जुलैपर्यंत शिल्लक तूर खरेदी केली जाणार आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांकडे जावून पुन्हा यंक्षणा तूर शिल्लक आहे किंवा नाही, याची पाहणी करणार आहे. तसेच सातबारा, पेरा आणि शेतकऱ्यांनी यापूर्वी कुठे तूर विकली, याचे हमीपत्र घेतले जाणार आहे. त्यानंतर खरेदी करायची अथवा नाही, याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांवर सोडण्यात आला आहे. हे आदेश धडकताच जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी तातडीची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेऊन खरेदीचे निर्देश दिले.