हिवाळ्यातच पैनगंगा कोरडी
By admin | Published: November 4, 2014 10:47 PM2014-11-04T22:47:33+5:302014-11-04T22:47:33+5:30
तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा यंदा पहिल्यांदाच हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे तीरावरील ५० गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. गुराढोऱ्यांच्या पिण्याच्या
अविनाश खंदारे - उमरखेड (कुपटी)
तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा यंदा पहिल्यांदाच हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे तीरावरील ५० गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. गुराढोऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर येत असून पैनगंगेच्या भरोशावर सिंचन करणारे शेतकरीही अडचणीत आले आहे.
यावर्षी उमरखेड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे बाराही महिने खळखळून वाहणारी पैनगंगा हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. सध्या नदीचे पात्र कोरडे असून नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. पैनगंगेसोबतच परिसरातील सर्व नदी, नालेही कोरडे झाले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई दरवर्षी उन्हाळ्यात जाणवते. मात्र हिवाळ्यात यंदा पहिल्यांदाच जाणवू लागली आहे. त्यामुळे नदी तीरावरील तिवरंग, झाडगाव, भांबरखेडा, जगापूर, गौळ, हातला, दिवट पिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, बारा, चिंचोली, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, विडूळ, चालगणी, टाकळी, साखरा, खरूस, दिघडी, लोहरा, देवसरी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सिंदगी, सोईट, गाजेगाव, ढाणकी, बिटरगाव, भोजनगर तांडा, सावळेश्वर, आकोली, मुरली, थेरडी, परोटी वन, गाडी, जवराळा, खरबी, दराटी, मोरचंडी या भागात आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे.
या परिसरातील महिला व पुरुषांना पाच ते दहा किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. तालुका प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. परिणामी पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. पैनगंगेच्या तीरावरून अनेक गावांच्या नळयोजना आहे. परंतु पैनगंगा आटल्याने या विहिरीतील पाणीही तळाला लागले आहे. त्यामुळे अनेक नळयोजना अखेरचा श्वास घेत आहे. त्यातच भारनियमनानेही पाणी गावापर्यंत पोहोचविणे अशक्य होत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तीव्र होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गोपालन केले जाते. परंतु पाणीटंचाईने जनावरांसाठी पाणी उपलब्ध कसे करावे, असा प्रश्न आहे. अनेक शेतकरी पैनगंगेवर मोटरपंप लावून रबीचे सिंचन करतात. मात्र यावर्षी पैनगंगा हिवाळ्यातच कोरडी पडल्याने सिंचन करणेही शक्य होणार नाही.