इथे भरतो माणसांचा बाजार आणि होतो कष्टाचा लिलाव !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 18:17 IST2024-07-06T18:15:30+5:302024-07-06T18:17:37+5:30
काम मिळण्याची शास्वती नाही : गांधी चौकात रोज सकाळी गर्दी

People gather in the market to get work
जब्बार चीनी
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : दोन वेळच्या जेवणाची भ्रांत.... कामाच्या शोधात गावातील मुख्य बाजारपेठेतील जागा पकडत कुटुंब कबिल्यासह उभं राहायंच.. काम मिळालं तर ठीक, नाही तर काम मिळेपर्यंत तिथंच थांबायचं.. कारण या ठिकाणाहून मिळणाऱ्या रोजी रोटीवरच त्यांचे पावसाळ्यातील जगण्याचे गणित अवलंबून असते. कामाची शाश्वती नसली तरी १०० हून अधिक रोजगार मजुराच्या बाजारात रोज नव्या उमेदीने उभे राहतात. वणी शहरातील महात्मा गांधी चौकातील कमानीजवळ सकाळी काम मिळेल, या आशेने अनेक महिला व पुरुष कामगार उभे असतात. अनेकदा यातील अनेकांना एखाद्या दिवशी कामही मिळत नाही. कामाच्या स्वरूपावरून मजुरी सांगितली जाते. ज्याला काम करून घ्यायचे असते, तो मजुरी देण्यासाठी घासाघीस करतो. मजुराला रोजी पटली तर तो कामाला जातो. अन्यथा हा सौदा फिस्कटतो. गेल्या अनेक वर्षांपासून हे असेच चालत आले आहे. दररोज सकाळी महात्मा गांधी चौकातील कमानीजवळील परिसर मजुरांच्या गर्दीने फुलून असतो.
आधी भाव ठरवला जातो
कामगाराच्या शोधात ज्या व्यक्ती इथे येतात. काम किती व कोणत्या प्रकारचे आहे त्यानुसार मजुरी ठरविली जाते. मजुरीचा दर पटला तर हे कामगार कामावर जातात.
काय आहेत मजुरीचे दर
मिस्त्री - ₹७००
मिस्त्रीच्या हाताखाली - ₹५००
सिमेंट मटेरियल कालवणे - ₹४५०
नियमित काम - ₹४५०
ठेकेदाराचा वेगळा टक्का
या बाजारात येणाऱ्या मजुरांचे ठेकेदार ठरलेले असतात, ठेकेदार एखाद्या कामाचा ठेका घेतात. ते काम मजूर गोळा करतात. परंतु त्यातही ठेकेदार आपलं कमिशन ठेवून मजुरी देतो.
सकाळी ७ ते १० गर्दी
वणीतील गांधी चौकाजवळील कमानीजवळील परिसर सकाळी ७ वाजेपासून तर १० वाजेपर्यंत मजुरांनी गजबजलेला असतो. गावातील मजूर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात.
मोजक्याच हातांना मिळते काम...
"येणाऱ्या सर्वांना काम मिळेल याची शाश्वती नाही. काम मिळालं तरी सुरक्षितता नाही. असं असतानाही पोटासाठी मजूर या बाजारात येत असतात."
- मोहन वाइकर, कामगार,
"या बाजारात मूलभूत सोयी नाहीत. खेड्यापाड्यातून येणाऱ्या मजुरांना उन्हातान्हात, उभं राहावं लागतं. त्यांच्यासाठी कुठलीही शेड नाही. पिण्याचे पाणी नाही."
- बजरंग वाघडकर, कामगार
"आम्हाला विमा नाही आणि आरोग्य सुविधाही नाही. कामाच्या ठिकाणी अपघात घडला तर कसलीच हमी नाही. तरीही पोटासाठी कामं सुरूच राहतात."
- अजय भगाडे, कामगार.