सभागृहात लोकाभिमुख निर्णय व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 09:38 PM2018-11-12T21:38:39+5:302018-11-12T21:39:07+5:30
जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्त्वाची शिखर संस्था आहे. ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्याने जिल्हा परिषद सभागृहात सकारात्मक चर्चेद्वारे लोकाभिमुख निर्णय झाले पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्त्वाची शिखर संस्था आहे. ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्याने जिल्हा परिषद सभागृहात सकारात्मक चर्चेद्वारे लोकाभिमुख निर्णय झाले पाहिजे. या निर्णयाची अधिकाऱ्यांनी तातडीने अंमलबजावणी केली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या सुसज्ज सभागृहाचे उद्घाटन माधुरी आडे यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, सभापती अरुणा खंडाळकर, प्रज्ञा भुमकाळे, निमिष मानकर, नंदिनी दरणे, रेणू शिंदे, मंगला पावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, मनोज चौधर, चंद्रशेखर खंदारे, मनोहर शहारे, राजेश चौधरी, बी.के. येंडे, के.एन. वानखडे, सुचिता पाटेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नवीन सभागृहात होणाऱ्या आजच्या पहिल्या सभेत नवीन ऊर्जा घेऊन आपण सकारात्मक चर्चेद्वारे लोककल्याणकारी निर्णय घेऊया, असे आवाहन माधुरी आडे यांनी केले. अधिकाºयांनी कामचुकारपणा न करता प्रशासन गतीमान करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. याप्रसंगी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.