लोक म्हणाले पडाल...तरी ते धावले अन् जिंकलेही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:23 PM2018-01-06T23:23:17+5:302018-01-06T23:23:57+5:30
पायात कमरेपर्यंत पोते घालून चिमुकले हर्षातिरेकाने धावत होते. बघणारे लोक म्हणाले, अरे धावू नका, पडाल... पण तरीही ते धावलेच अन् जिंकलेही. लोक आपले विजयी चेहरे कॅमेऱ्यात टिपत आहेत, हे बघायलाही त्या चिमुकल्यांना फुरसदच नव्हती. कारण त्यांना डोळेच नाहीत!
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पायात कमरेपर्यंत पोते घालून चिमुकले हर्षातिरेकाने धावत होते. बघणारे लोक म्हणाले, अरे धावू नका, पडाल... पण तरीही ते धावलेच अन् जिंकलेही. लोक आपले विजयी चेहरे कॅमेऱ्यात टिपत आहेत, हे बघायलाही त्या चिमुकल्यांना फुरसदच नव्हती. कारण त्यांना डोळेच नाहीत!
अंध विद्यार्थ्यांची ही स्पर्धा डोळसांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. शनिवारी यवतमाळलगतच्या पिंपळगाव परिसरात ही स्पर्धा झाली. निवासी अंध विद्यालयाने लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त ४ ते ६ जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. शनिवारी या उत्सवाच्या समारोपापूर्वी अनोखी स्पर्धा घेण्यात आली. अंध विद्यार्थ्यांनी धावायचे. त्यातही पायात पोते घालून धावायचे. डोळे नाहीच, पायही नाहीत... तरी विद्यार्थी आनंदाने धावले. त्यात रेणुका चव्हाण, प्रतिभा खुडे, प्रशांत मडावी, माधव राजूरकर, आकाश कांबळे, मालू जाधव या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. पोते घालून उड्या मारताना हरण्या-जिंकण्यापेक्षा मुग्धपणे हसण्याचाच सोहळा होता. हसण्यासाठी जिंकणेच गरजेचे नसते, हे या मुलांनी सिद्ध केले.
अंध विद्यार्थी म्हणजे असहायता, असाच अनेकांचा समज असतो. पण या विद्यार्थ्यांनी अंताक्षरी स्पर्धेत दाखविलेला उत्साह निराश मनांना तजेला देणारा होता. ‘ओ पालन हारे निर्गण ओ न्यारे, तुम्हरे बिन हमरा कौनो नाही’ हे गीत त्यांच्या तोंडून ऐकताना श्रोत्यांना त्यांच्या अपंगत्वाची जाणीव झाली. पण लगेच ‘यारा ओ यारा तेरी अदाओ ने मारा’ म्हणत विद्यार्थ्यांनी आपले ‘सामान्यत्व’ सिद्ध केले. मुली आणि मुलांच्या गटात रंगलेल्या अंताक्षरीदरम्यान दोन्ही गट एकमेकांवर विनोद करीत हसत होते, गाणी गात होते. एकमेकांना चिडवित, चिमटे घेत दंगामस्ती करताना हे चिमुकले स्वत:चे वैगुण्य विसरून गेले अन् प्रेक्षकही!