जनता कर्फ्यू स्वयंस्फूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 05:00 AM2020-03-23T05:00:00+5:302020-03-23T05:00:41+5:30
जनता कर्फ्यू हा कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी हत्यार जिल्हावासीयांनी पहिल्याच दिवशी अतिशय प्रभावीपणे राबविले. प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत रविवार २२ मार्चला कुणीही घराबाहेर पडले नाही. काहींना अत्यावश्यक गरजेसाठी बाहेर पडावे लागले. मात्र त्यांनीही काही मिनिटात काम आटोपून घर गाठले. यवतमाळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील सोळाही तालुके व गावागावात हे चित्र पहावयास मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जनता कर्फ्यू हा कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी हत्यार जिल्हावासीयांनी पहिल्याच दिवशी अतिशय प्रभावीपणे राबविले. प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत रविवार २२ मार्चला कुणीही घराबाहेर पडले नाही. काहींना अत्यावश्यक गरजेसाठी बाहेर पडावे लागले. मात्र त्यांनीही काही मिनिटात काम आटोपून घर गाठले. यवतमाळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील सोळाही तालुके व गावागावात हे चित्र पहावयास मिळाले.
जिल्ह्यातील अंतर्गत वाहतुकीची साधनेही पूर्णत: बंद होती. एसटी महामंडळाने ४२५ गाड्यांच्या एक हजार फेऱ्या रद्द केल्या. खासगी प्रवासी वाहने, आॅटोरिक्षाही रस्त्यावर दिसलाच नाही. यवतमाळ, वणी, पुसद, उमरखेड, दिग्रस, आर्णी, महागाव, दारव्हा, नेर, बाभूळगाव, कळंब, घाटंजी, मारेगाव, झरी, पांढरकवडा, राळेगाव तालुक्यात जनता कर्फ्यूला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजीमंडी व्यवस्थापनाने रविवारी बंदची घोषणा केल्यामुळे भाजीपाला, दूध या सारख्या वस्तूही बाजारपेठेत आणल्या नाही. प्रमुख मंदिरे, चर्च, प्रार्थना स्थळेसुद्धा पूर्णत: बंद होती. शनिवारी मध्यरात्रीच लॉक डाऊनची घोषणा झाल्यानंतर नागरिक घरी गेले. ते बाहेर निघालेच नाही. ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पोलीस नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकावरून करीत होते. सायंकाळी ५ वाजता सायरन वाजताच शहरासह गावखेड्यातील नागरिकांनी घरासमोर उभे राहून थाळीनाद, टाळ्या वाजवून प्रशासनाच्या उपाययोजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. घरासमोर आलेले नागरिक काही मिनिटातच परत माघारी फिरले. अनेकांचे दारही पूर्णवेळ बंद होते. रात्री ९ नंतर पुन्हा पोलिसांची गस्त सुरू झाली. कुणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन केले जात होते. यावेळीसुद्धा नागरिक घरातच होते. सर्वत्र चिटपाखरुही दिसत नव्हते. रस्त्यांवर निरवशांतता पसरली होती.
जीवनावश्यक वस्तू विक्री सुरू
जनता कर्फ्यूमध्ये व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्त जीवनावश्यक वस्तूंची विक्रीही बंद ठेवली होती. किराणा, दुध, भाजीपाला मिळत नव्हता. मात्र सोमवारपासून सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात येईल, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले. रविवारी रात्री दुधाची दुकाने उघडली होती. कोणत्याही कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, १४४ कलम लागू झाल्याने विनाकारण गर्दी करणारे, भटकणारे यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे तसे निर्देश प्रशासनाने दिले आहे.
यवतमाळचा एक युवक मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह
आफ्रिकेतून भारतात परतलेला यवतमाळातील युवक मुंबई विमानतळावर चाचणीमध्ये कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. त्याला तेथेच ठेवण्यात आले आहे. जिल्ह््यात १५० संशयितांना होम क्वॉरेनटाईन केले आहे. शासकीय रुग्णालयात सहा जण निगरानी खाली आहेत. यापैकी एकाचा रिपोर्ट निगेव्हीव आल्याने त्याला सुटी देऊन होम क्वॉरेनटाईन केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात विदेशातून आलेले ११६ संशयित आहे. तर २३ जण थेट संपर्कात आलेले आहेत. मुंबई, पुणे येथून आलेले ११ जण निगराणीत आहे.
असेच सहकार्य करा
कोरोनाला थांबविण्यासाठी प्रतिबंध हाच उपाय आहे. नागरिकांनी जनता कर्फ्यूच्या माध्यमातून उत्तम सहकार्य केले. पुढील काही दिवस नागरिकांनी संयम ठेऊन गर्दी टाळावी. सकाळी ५ वाजतापासून नागरी भागात कलम १४४ लागू होणार आहे.
- एम.डी.सिंह
जिल्हाधिकारी
स्वत:साठी घरात थांबा
कुटुंब, देश व मानवतेसाठी हा महत्वाचा काळ आहे. प्रत्येकाने पुढचे काही दिवस घरात थांबून सहकार्य करावे. कुठल्याच अत्यावश्यक वस्तूंची दुकाने बंद केली जाणार नाही. धावपळ करू नये, काही अडचण असल्यास पोलीस ठाण्यात मदत मागावी. पोलीस मदतीसाठी तत्पर आहे.
- एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक