वेकोलिच्या कोळसा खाणी उठल्या नागरिकांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 10:39 AM2021-12-22T10:39:34+5:302021-12-22T11:34:38+5:30
कोळसा खाणींमुळे या भागात वायू, जल आणि धूळ प्रदूषणाची समस्या बिकट झाली आहे. एका सर्वेक्षणानुसार ज्या भागात कोळसा खाणी आणि प्रदूषणकारी उद्योग आहेत, तेथील ५० टक्के नागरिक श्वसनाशी संबंधित आजार घेऊन जगत आहेत.
संतोष कुंडकर
यवतमाळ : कोळसा उद्योगाने व्यापलेल्या वणी परिसरातील नागरिकांचे आयुष्य प्रदूषणकारी धुराने अक्षरश: काळवंडले आहे. धूळ आणि उद्योगांच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजारांशी झुंजावे लागत आहे. मात्र, प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. तसेच होणाऱ्या आजारांवरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणाही सक्षम केली जात नाही.
यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात उकणी, जुनाड, कोलार पिंपरी, पिंपळगाव, राजूर, कुंभारखणी, भांदेवाडा, घोन्सा, नीलजई, नीलजई क्रमांक २, नायगाव, मुंगोली अशा एकूण १२ कोळसा खाणी आहेत. यापैकी पिंपळगाव, राजूर, कुंभारखणी, नीलजई १ या कोळसा खाणी बंद आहेत. उर्वरित कोळसा खाणींमधून नियमितपणे कोळशाचे उत्खनन सुरू आहे. कोळसा खाणींमुळे या भागात वायू, जल आणि धूळ प्रदूषणाची समस्या बिकट झाली आहे. उन्हाळ्यात वाढत्या तापमानाने खाणीत कोळशाच्या ढिगाऱ्यांना आग लागते. त्यामुळे तेथून सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनोक्साईड, मिथेन यासारखे मानवी जिवांसाठी घातक वायू उत्सर्जित होतात. त्यातून फुप्फुसाशी संबंधित आजार बळावतो.
एका सर्वेक्षणानुसार ज्या भागात कोळसा खाणी आणि प्रदूषणकारी उद्योग आहेत, तेथील ५० टक्के नागरिक श्वसनाशी संबंधित आजार घेऊन जगत आहेत. वणी भागातही हीच परिस्थिती पाहायला मिळते. लगतच्या राजूर कॉलरी येथील चुनाभट्ट्याच्या धुरांड्यातून निघणारा धूरही नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचवित आहे. धूळ प्रदूषणामुळे पशुपक्षी आपले अधिवास इतरत्र हलवित आहेत.
कोळसा उत्खननासाठी अनियंत्रित ब्लास्टिंग केले जाते. त्यामुळे वन्यजीव घाबरून इतरत्र पळून जात आहेत. कोळसा उद्योगामुळे या भागातून वाहणारी वर्धा नदी अनेक ठिकाणी प्रदूषित झाली आहे. नियम पायदळी तुडवून खाणीतून मातीचे डोंगराएवढे ढिगारे नदीकाठावर उभे केले जात आहेत. त्यामुळेही नदीच्या प्रदूषणात भर पडली आहे.
सीएसआर फंड जातो कुठे?
पर्यावरण व मानवी आरोग्याची हानी रोखण्यासाठी वेकोलिच्या सीएसआर फंडातून उपाययोजना करणे अपेक्षित असते. प्रत्येक कोळसा खाणीला एकूण उत्पन्नापैकी २ टक्के सीएसआर फंडांतर्गत खाण परिसरातील ५ किलोमीटर भागातील उपाययोजनांवर खर्च करावयाचे असतात. परंतु या फंडाचा योग्य विनियोग होताना दिसत नाही.
प्रदूषणामुळे सुमारे १० टक्के मुलांमध्ये बालदमा आढळून येतो, तर ३० टक्के मुलांमध्ये ॲलर्जीसंदर्भातील समस्या दिसून येतात.
- डॉ. सुनील जुमनाके, बालरोगतज्ज्ञ, वणी.