जनतेच्या रक्षकांचे जीर्ण घरांत वास्तव्य, कुटुंबीयांचीही चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 06:19 PM2024-09-30T18:19:28+5:302024-09-30T18:21:34+5:30
बिटरगाव पोलिस ठाणे: ४५ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी
लोकमत न्यूज नेटवर्क
बिटरगाव : उमरखेड तालुक्यातील बंदी भागात बिटरगाव येथे पोलिस ठाणे व कर्मचाऱ्यांसाठी वसाहत आहे. निवासस्थाने जीर्ण झाल्याने जनतेचे रक्षकच असुरक्षित झाले. कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सतत जीर्ण घरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबीयांची चिंता सतावत राहते. बिटरगाव पोलिसांना ४५ गावांच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.
बिटरगाव येथे ब्रिटिश काळात पोलिस ठाण्याची स्थापना झाली. त्याचवेळी निवासस्थाने बांधली गेली. वेळोवेळी त्यांची डागडुजी करण्यात आली. मात्र आता ही निवासस्थाने जीर्ण झाली आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. जीव मुठीत घेऊन पोलिस कुटुंबांना वास्तव्य करावे लागत आहे. बंदी भागातील ४५ गावांतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी या पोलिस कर्मचाऱ्यांवर आहे. दोन अधिकारी आणि ३२ कर्मचारी ही जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र त्यांच्या घराची दैनावस्था झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करणे अवघड झाले आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी मुरून निवासस्थानाच्या भिंती फुगल्या आहेत. अखेर पोलिसांनीच निवासस्थाने व ठाण्यावर टिनाचे शेड टाकले आहे.
बिटरगाव हा परिसर अतिशय दुर्गम म्हणून ओळखला जातो. पोलिसांना ४५ गावांचा डोल्हारा सांभाळावा लागत आहे. ही एक प्रकारची कसरतच मानली जाते. या भागात कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. यामुळे येथे काम करण्यासाठी पोलिस कर्मचारी व अधिकारी येण्याचे टाळतात. त्यांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.
ब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्ण
ब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्ण झाली. देश स्वतंत्र झाल्यावर १९४७ मध्ये नवीन वास्तू बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. मात्र, ७० वर्षांनंतरही हा प्रस्ताव धूळखात पडून आहे. परिणामी धोकादायक ठाणे आणि निवासस्थाने ब्रिटिशकालीन ठाण्याची वास्तूही जीर्ण कधीही कोसळण्याची शक्यता बळावली आहे. यंदा परतीच्या पावसाने ठाण्यात वायरलेस कक्षातील पीओपीच्या छताला छिद्रे पडली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी साधे निवासस्थान मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय ठाण्यातील वाहनही जुने झाले आहे. यामुळे एखादी घटना घडल्यास पोहोचण्यासाठी अडचण जाते.
ग्रामपंचायत ठरावाकडे दुर्लक्ष
निवासस्थानाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. येथील ग्रामपंचायत वारंवार ग्रामसभेचा ठराव घेऊन संबंधितांकडे निवासस्थाने व ठाण्याच्या वास्तूची दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम करण्यासाठी साकडे घालत आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. बिटरगाव हे बंदी भागात मोडते. या परिसरात घनदाट जंगल आहे. काही वर्षांपूर्वी या जंगलात नक्षल्यांचाही वावर होता. त्यामुळे बिटरगावचे पोलिस ठाणे जिल्ह्यात संवेदनशील म्हणून ओळखले जाते.