जिद्द, इच्छाशक्तीच्या बळावर कर्करोगावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:45 AM2021-05-20T04:45:09+5:302021-05-20T04:45:09+5:30
फोटो विडूळ : जिद्द आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. अगदी मृत्यूलादेखील हरवू शकतो. ...
फोटो
विडूळ : जिद्द आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. अगदी मृत्यूलादेखील हरवू शकतो. याचे मूर्तिमंत उदाहरण येथील १५ वर्षीय पराग वैशाली श्रीनिवास लिगदे होय.
मूळचा विडूळ येथील; परंतु आता औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेला पराग याला वयाच्या सहाव्या वर्षीच ब्रेन ट्युमर (कॅन्सर) असल्याचे निदान झाले. ही माहिती कळताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. परागचे खेळण्याबागडण्याचे वय असताना त्याला गंभीर आजाराने विळखा घातला; परंतु पालकांनी परिस्थिती बेताची असताना परागला गंभीर आजारातून बाहेर काढायचा निर्धार केला. त्याच्यावर मुंबईत जानेवारी २०११ पासून उपचार सुरू केले.
सध्या मागील दहा वर्षांपासून पराग आजारावर मात करीत आहे. आजपर्यंत त्याच्यावर ७० केमोथेरपी झाल्या. दर आठवड्यातून एकदा त्याला ही थेरपी घ्यावी लागत असे. त्याला केमोथेरपी घेतल्यानंतर त्रास होत होता. आजपर्यंत त्याने हार्मोन्सचे २२ इंजेक्शन, ब्रेन आणि स्पाइनचे १७, एमआरआय, हातापायाचे अनेक एक्स-रे, सतत दोन वर्षे पूर्णतः बेडवर झोपूनच ही ट्रीटमेंट घेतली. त्याला साधे उठता-बसता येत नव्हते. मात्र, आई-बाबांनी त्याला ‘जीवनात कधीही हार मानायची नाही, अशी प्रेरणा दिली. त्याचा आत्मविश्वास जागृत ठेवला. २४ मे २०१६ मध्ये पुन्हा एकदा ब्रेनचे ऑपरेशन झाल्यानंतर पराग व कुटुंबाला फरक पडत असल्याची जाणीव झाली. नंतर पराग हळूहळू चालायला लागला. त्याच्या आई-वडिलांनी प्रचंड परिश्रम घेतले. अखेर परागने आई-वडिलांची मेहनत आणि प्रचंड जिद्द व इच्छाशक्तीच्या बळावर कॅन्सरवर मात केली.
बॉक्स
‘लोकमत’च्या महामॅरेथाॅनने बदलले जीवन
कॅन्सरमधून बरे होताच पराग विविध मॅरेथाॅन स्पर्धेत सहभागी होऊ लागला. आजवर त्याने चक्क ४५ पेक्षाही जास्त मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला. मुंबईत टाटा मॅरेथॉनपासून त्याने सुरुवात केली. त्याचा आत्मविश्वास दृढावला. नंतर पुण्यात ‘लोकमत’च्या महामॅरेथॉन स्पर्धेने त्याचे जीवनच बदलून टाकले. या मॅरेथॉनमध्ये धावल्याने मला आत्मबल प्राप्त होऊन मी दुर्दम्य आजारावर मात करू शकलो, असे पराग अभिमानाने सांगतो. कॅन्सर असो की कोरोना, कोणत्याही दुर्धर आजाराची भीती न बाळगता आत्मविश्वास जागृत ठेवायचा आणि सोबतच आपली इच्छाशक्ती मजबूत ठेवायची, असे त्याने सांगितले. परागचे आई, वडील सध्या औरंगाबाद येथे राहतात. एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतात. पराग इतरांसारखेच आयुष्य जगू शकतो, हे पाहून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात.