नगरपरिषद समिती निवडी विरोधात न्यायालयात याचिका
By admin | Published: December 23, 2015 03:19 AM2015-12-23T03:19:10+5:302015-12-23T03:19:10+5:30
येथील नगरपरिषदेत गुरूवारी झालेल्या विषय समिती सभापती निवडीवर आक्षेप घेत नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सभेला कोरमच नाही : समिती निवडीनंतर खोडतोड
यवतमाळ : येथील नगरपरिषदेत गुरूवारी झालेल्या विषय समिती सभापती निवडीवर आक्षेप घेत नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
यवतमाळ नगरपरिषदेत विषय समित्या निवडण्यासाठी १७ डिसेंबरला सदस्याची बैठक घेतली. त्यानंतर दुपारी समिती सभापतींची निवड प्रक्रियेसाठी विशेष सभा बोलविण्यात आली होती. या सभेला स्वीकृत सदस्यासह केवळ १९ नगरसेवक होते. कोरम नसताना सुध्दा सभापतींची निवड करण्यात आली. शिवाय सकाळच्या सभेत समिती सदस्यांची केलेली निवड पुन्हा बदलविण्यात आली. एका स्वीकृत सदस्यांला तीन समिती आणि स्थायी समितीवरही निवडण्यात आले. विशेष म्हणजे सभेला असलेले पीठासीन अधिकारी विकास माने यांनी कोरम नसल्याबाबत कोणत्याच सदस्याने आक्षेप घेतला नाही, म्हणून सभा सुरळीत पार पडल्याचे लेखी दिले आहे. हा सर्व प्रकार नियमबाह्य असून अतिशय चुकीच्या पध्दतीने निवड प्रक्रिया पार पाडल्याचा आक्षेप नगरसेवक गजानन इंगोले आणि अफसर शहा यांनी घेतला आहे. या मुद्दावर त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. आता काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)