फुलसांवगी शाळेला पाचव्या दिवशीही टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 10:46 PM2018-07-25T22:46:55+5:302018-07-25T22:47:58+5:30
शिक्षकांच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून येथील केंद्रीय शाळेला टाळे लागले आहे. मात्र शिक्षण विभाग अद्याप उदासीन असल्याने आता २८ जुलै रोजी पालकांनी फुलसावंगी ते महागाव राज्य मार्गावरच शाळा भरविण्याचा पवित्रा घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलसावंगी : शिक्षकांच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून येथील केंद्रीय शाळेला टाळे लागले आहे. मात्र शिक्षण विभाग अद्याप उदासीन असल्याने आता २८ जुलै रोजी पालकांनी फुलसावंगी ते महागाव राज्य मार्गावरच शाळा भरविण्याचा पवित्रा घेतला आहे.
येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंत ३६५ विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे शिक्षकांची १३ पदे मंजूर आहे. मात्र केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहे. शिक्षकांच्या मागणीसाठी पालक व नागरिकांनी १२ जुलै रोजी शिक्षण विभाला निवेदन दिले. मात्र शिक्षक न मिळाल्याने २० जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकले. पाच दिवस उलटून गेल्यानंतरही शिक्षण विभाग जागा न झाल्याने आता पालकांनी रस्त्यावरच शाळा भरविण्याचा इशारा दिला आहे.
२८ जुलै रोजी सकाळी १० वाजता फुलसावंगी ते महागाव या राज्य मार्गावर शाळा भरविण्याचा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतला असून तसे निवेदन महागावचे तहसीलदार, गटविकास आधिकारी, ठाणेदार आदींना देण्यात आले. यावेळी अमर दळवे, अजय देशपांडे, योगेश बाजपेई, याकूब खान, शशिकांत नाईक, अनिल गवळी, रघू बाभळे यांच्यासह पालक व नागरिक उपस्थित होते.
अधिकारी, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष
शिक्षकांची वारंवार मागणी करूनही अधिकारी आणि शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत आहे. यामुळे पालक संतापले आहे. शाळेला कुलूप ठोकूनही प्रशासन दाद देत नसल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता चक्क राज्य मार्गावरच शाळा भरवून शासनाचा निषेध केला जाणार आहे.