फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, वाजंत्री कोरोनामुळे हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:39 AM2021-05-17T04:39:21+5:302021-05-17T04:39:21+5:30
दरवर्षी एप्रिल व मे महिने लग्नसराईचे दिवस म्हणून ओळखले जातात. यावर्षी एप्रिल व मे महिन्यात विवाह मुहूर्त होते. ...
दरवर्षी एप्रिल व मे महिने लग्नसराईचे दिवस म्हणून ओळखले जातात. यावर्षी एप्रिल व मे महिन्यात विवाह मुहूर्त होते. अनेक कुटुंबांनी विवाह समारंभाचा बेत केला होता. परंतु कोरोनामुळे सोहळे साध्या पद्धतीने उरकले जात आहे. ८० टक्के विवाह सोहळे रद्द झाले आहे. त्यामुळे लग्न समारंभासाठी घेतलेला ॲडव्हान्स परत देण्याची वेळ फोटोग्राफर, मंडप व्यावसायिकांवर आली आहे.
अनेक व्यावसायिकांनी व्यवसायासाठी पतसंस्था, बँकांकडून लाखो रुपये कर्ज काढून साहित्य घेतले. त्यावर ते चार ते सहा महिने व्यवसाय करून वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, याच काळात कोरोनाचे संकट आले आणि साहित्य धूळ खात पडले. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत लग्नाच्या तारखा फूल असतात. ऑर्डर रद्द कराव्या लागतात. मात्र, यंदा शटर डाऊन करून घरी बसण्याची वेळ आली आहे.
बॉक्स
आता डिसेंबरपर्यंत मुहूर्तच नाही
आता पुढील डिसेंबरपर्यंत लग्नाचे मुहूर्त नाही. पुढचे सात महिने कसे जाणार, याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. बँकेचे हप्ते भरायचे की घर चालवायचे, हा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. रेशन आणून सध्या उदरनिर्वाह होत आहे. साहित्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. त्यामुळे शासनाने मदत देऊन दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.