प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी शारीरिक शिक्षण कार्ड
By admin | Published: March 2, 2015 02:09 AM2015-03-02T02:09:46+5:302015-03-02T02:09:46+5:30
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास हा केवळ मुलांना वर्गाबाहेर काढून पूर्ण केल्या जात होता. मुलांमध्ये क्रीडा नैपुण्य यावे यासाठी ...
यवतमाळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचा तास हा केवळ मुलांना वर्गाबाहेर काढून पूर्ण केल्या जात होता. मुलांमध्ये क्रीडा नैपुण्य यावे यासाठी प्रत्येक मुलाला शारीरिक शिक्षण कार्ड देण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २०० शिक्षकांना प्रशिक्षित केले जात आहे. याची जबाबदारी सहा मास्टर ट्रेनरवर सोपविण्यात आली आहे.
यापूर्वी प्राथमिक शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाचे आठवड्यातून पाच तास घेतले जात होते. मात्र शारीरिक शिक्षणाचा तास म्हणजे शिक्षकांची विश्रांती असाच होत होता. मुलांना वर्गाबाहेर सोडून त्यांना वाटेल तसे खेळू दिले जायचे. त्यांच्या प्रशिक्षण अथवा क्रीडा अभिरुची निर्माण होण्यासाठी विशेष असे कोणतेच प्रयत्न होत नव्हते. शारीरिक शिक्षकाचे काम केवळ कागदोपत्री चालत होते. या संपूर्ण गोष्टी थांबविण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी युनिसेफच्या निर्देशानुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये चपळता, संतुलन, समन्वय या तीन गुणांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी शारीरिक शिक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार खेळ, शारीरिक शिक्षणासाठी १०० शाळांची निवड करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र हा सुत्य उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्याचा निर्णय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतला आहे. तशा सूचना त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी सूचिता पाटेकर यांना दिल्या आहेत. सहा शिक्षकांनी मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. शासकीय अध्यापक महाविद्यालयात २०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यानंतर तालुका पातळीवर शारीरिक शिक्षकांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. शाळांमध्ये क्रीडा साहित्य पुरविण्यात येणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा अभिरूची वाढविण्यासाठी शासनस्तरावरूच नव्याने प्रयत्न केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)