शेतकऱ्यांसाठी पायलट प्रोजेक्ट
By admin | Published: August 20, 2016 12:04 AM2016-08-20T00:04:47+5:302016-08-20T00:04:47+5:30
यवतमाळ आणि उसमानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्या प्रवण म्हणून ओळखला जातो.
पांडुरंग फुंडकर : यवतमाळ, उस्मानाबादसाठी ११०० कोटी
यवतमाळ : यवतमाळ आणि उसमानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्या प्रवण म्हणून ओळखला जातो. या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनातर्फे ११०० कोटींचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असल्याची घोषणा कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी येथे केली.
येथील वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मुले आणि मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवीप्रकाश दाणी, कृषि शास्त्रज्ञ डॉ. चारूदत्त माई, कुलसचिव डॉ. कडू, नितीन हिवसे, गोपी ठाकरे, अधिष्ठाता डॉ. भाले उपस्थित होते. फुंडकर यांनी शेतीची स्थिती सुधारण्यासोबतच आत्महत्या प्रवण यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ११०० कोटींचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. शेतीशी निगडीत जोडधंदा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. जोडधंद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. या माध्यमातून कृषिला पुन्हा वैभवाचे दिवस प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी महाविद्यालयांतील संशोधन, उद्दिष्ठांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे कृषीमंत्री फुंडकर यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)
‘ती’ महाविद्यालये बंद करणार
विद्यार्थ्यांसाठी कृषि महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली. मात्र या महाविद्यालयांकडे कोणतीही सुविधा नाही. केवळ व्यवस्थापन कोट्यातून देणगी घेऊन ही महाविद्यालये प्रवेश देण्याचे काम करतात. येत्या तीन महिन्यात सुविधा नसणाऱ्यांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचे फुंडकर यांनी सांगितले.