कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर गुलाबी बोंडअळीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:59 AM2018-06-15T11:59:30+5:302018-06-15T11:59:38+5:30

यवतमाळसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी या खरीप हंगामातसुद्धा गुलाबी बोंडअळीच्या सावटात वावरताना दिसत आहे. त्यामुळे कपाशीचा पेरा सरसकट दहा टक्क्याने घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

The pink bollworm on cotton farmers | कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर गुलाबी बोंडअळीचे सावट

कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर गुलाबी बोंडअळीचे सावट

googlenewsNext
ठळक मुद्देआक्रमणाची भीती कपाशीचा पेरा दहा टक्क्याने घटण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी या खरीप हंगामातसुद्धा गुलाबी बोंडअळीच्या सावटात वावरताना दिसत आहे. त्यामुळे कपाशीचा पेरा सरसकट दहा टक्क्याने घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
गेल्या खरीप हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाले होते. या अळीने कपाशीचे संपूर्ण बोंडच पोखरले. अळीचे आक्रमण परतवून लावताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जहाल कीटकनाशकांची फवारणी केली. त्याची विषबाधा होऊन राज्यात ६२ शेतकरी-शेतमजुरांचा बळी गेला. त्यात सर्वाधिक संख्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात नोंदविली गेली आहे. ही बोंडअळी यावर्षीसुद्धा कॉटन बेल्टमध्ये आक्रमण करण्याची भीती कृषी विभागाला आहे. त्यामुळेच बियाणे खरेदी करताना शेतकऱ्याला कृषी केंद्र चालकांकडून सतर्क केले जात आहे. तर कृषी खात्याची यंत्रणा बियाणे विक्रेत्यांना सतर्क करताना दिसते आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रकोप गेल्या वर्षी केवळ महाराष्ट्रतील कापूस उत्पादक जिल्ह्यांपुरताच मर्यादित नव्हता तर लगतच्या तेलंगणा, मध्यप्रदेश व गुजरातमध्येही आक्रमण केले होते.

साडेपाच हजारांच्या भावाची अपेक्षा
देशात सरसकट दहा टक्के पेरा कमी होण्याचा अंदाज असल्याने पुढच्या वर्षी कपाशीला साडेपाच हजारांपेक्षा अधिक भाव राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुजरातला सध्याही चांगल्या कापसाला ६१०० प्रति क्ंिवटल भाव दिला जात आहे. सरकी व ढेपेची मागणी अधिक असल्याचा हा परिणाम मानला जातो. तेथे रुईगाठीलासुद्धा ५०० रुपये अधिकचा भाव मिळतो.

रूईगाठींच्या साठ्यात सर्वाधिक घट
एकीकडे कपाशीचा पेरा घटतो आहे तर दुसरीकडे रूईगाठींच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात घट होते आहे. २०११ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने रूईगाठींच्या साठ्यात घट झाल्याचे सांगितले जाते. सध्या केवळ १६ लाख रूईगाठी शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. रूईगाठींना बाजारात सध्या ४७ हजारांचा भाव आहे. पुढच्या वर्षी तो ५४ हजार राहण्याची अपेक्षा आहे. महिनाभरातच हा भाव ५० हजारांवर व आॅक्टोबरनंतर ५४ हजारापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

गुलाबी बोंडअळी ओळखणे कठीण
सामान्य शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी कठीण जाते. सतत शेतीच्या संपर्कात असलेल्या तज्ज्ञ शेतकऱ्यालाच हे आक्रमण ओळखता येते. गावात अशा शेतकऱ्यांची संख्या अवघी दोन ते तीन राहते. बोंडाच्या खालून शिरकाव होत असल्याने संपूर्ण बोंड पोखरल्यावरच अळीचे आक्रमण दृष्टीस पडते, हे विशेष.

Web Title: The pink bollworm on cotton farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती