गुलाबी बोंड अळीने शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 09:59 PM2017-10-30T21:59:33+5:302017-10-30T21:59:48+5:30
शनिवार, २१ आॅक्टोबरच्या वादळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला. आता कपाशीवरील गुलाबी बोंड अळीमुळे हाताशी आलेले पीक पुरते हिरावले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मांगलादेवी : शनिवार, २१ आॅक्टोबरच्या वादळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला. आता कपाशीवरील गुलाबी बोंड अळीमुळे हाताशी आलेले पीक पुरते हिरावले आहे. प्रशासनाने अद्यापही सर्वेक्षण सुरू न केल्याने न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न मांगलादेवी व परिसरातील शेतकरी डबडबलेल्या नजरेने करीत आहेत. या ज्वलंत प्रश्नी नेते मंडळी केवळ शेताला भेट देऊन शेतकºयांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे सोपस्कार पार पाडत आहे.
झाडाची हिरवी बोंडेही कीडीने पोखरली आहे. शेतकºयांनी आपली कैफियत जिल्हाधिकाºयांकडे मांडली. यानंतर महसूल राज्यमंत्री संजय राठोड, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, देवानंद पवार यांनी शेतकºयांच्या शेतात जाऊन त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला.
रविवारी संजय राठोड यांनी कृषी संचालक, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, संबंधित बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधींसोबत मांगलादेवी येथील रामभाऊ दहापुते यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांना संपूर्ण शेतच बोंड अळीने फस्त केलेले दिसले. दहापुते यांना मागच्यावर्षी याच शेतात ५८ क्विंटल कापूस झाला होता. यंदा मात्र एक क्विंटलही कापूस होणार नाही, कर्ज काढून शेती केली, परंतु बोंड अळीने पुरता बर्बाद झालो, असे त्यांनी डोळ्यात आसवे आणत राज्यमंत्र्यांना सांगितले. अशीच परिस्थिती मांगलादेवी व परिसरातील शेतकºयांची आहे. यावेळी ना. राठोड यांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे लेखी तक्रार दाखल करण्याचे आवाहन शेतकºयांना केले. बीटी कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.