नेर तालुक्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचा हल्ला, पीक उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 06:00 AM2019-12-22T06:00:00+5:302019-12-22T06:00:07+5:30
टेंभी, शिरसगाव, सिंदखेड, पिंपळगाव(डुब्बा) तालुक्यातील या गावांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. अनेक बोंडांमध्ये अळी अंडे देण्यात व्यस्त आहे. कृषी विभागाला याबाबत वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून कोणतेच मार्गदर्शन अथवा उपाय सुचविण्यात आलेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : तालुक्यातील कापसाचे पीक धोक्यात आले आहे. कृषी व कृषी संशोधन केंद्राच्या सुचविलेल्या उपाययोजनाही आता काम करत नाहीत. गुलाबी बोंडअळीने पुन्हा कापसाच्या बोंडात घर केले आहे. उभे कापसाचे पीक या बोंडअळी फस्त करीत आहेत. शेतकरी हतबल झाला आहे.
टेंभी, शिरसगाव, सिंदखेड, पिंपळगाव(डुब्बा) तालुक्यातील या गावांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. अनेक बोंडांमध्ये अळी अंडे देण्यात व्यस्त आहे. कृषी विभागाला याबाबत वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून कोणतेच मार्गदर्शन अथवा उपाय सुचविण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांनी या बोंडअळीच्या प्रकोपातून पीक वाचविण्यासाठी कृषी केंद्र चालकाच्या सल्ल्याने उपाययोजना केल्या. मात्र त्यात अपयश आले. आता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन गुलाबी बोंडअळीच्या संकटात शेतकऱ्यांना योग्य साथ द्यावी, अशी मागणी होत आहे. बोंडअळीमुळे कापसाचे संपूर्ण उत्पन्नच धोक्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत यांच्यास्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शासनाने काही वर्षांपूर्वी राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे, कृषी अधीक्षकांना बोंडअळी नियंत्रणाच्यादृष्टीने सतर्क केले होते. नागपूरच्या कापूस व संशोधन केंद्रात शास्त्रज्ज्ञांनी गुलाबी बोंडअळीची विष पचविण्याची क्षमता १३८७ पट वाढल्याचे सांगितले होते. त्यानंतरही राज्यातील सर्व कृषी विद्यापीठ कापूस संशोधन केंद्र बोंडअळीचे संपूर्ण उच्चाटन करण्यात अपयशी ठरले. जेनेटिक इंजिनिअरिंग कंपनीने बीजी-३ ला परवानगी दिली नाही. त्यानंतरही नेरमध्ये बीजी-३ ची पेरणी झाली. एकंदरीत देशी वाणांचे बियाणे संपुष्टात आणण्यासाठी परकीय कंपन्यांनी बियाण्यावर अधिराज्य निर्माण केले आहे. गुलाबी अळीला जन्म देणाºया बियाण्यांची निर्मिती केली जात आहे. यामुळे शेतकºयांची दैनावस्था झाली आहे.
कृषी विभागाची यंत्रणा सुस्तच
नेर तालुक्यात बोंडअळीचा उद्रेक झाला असताना कृषी विभागाची यंत्रणा सुस्त आहे. बोंडअळी नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होत नाही. या गंभीर प्रकरणाची जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची गरज आहे.