ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी पुरातून पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 05:00 AM2021-07-25T05:00:00+5:302021-07-25T05:00:02+5:30
२००५ मध्ये वाकान गाव पुराने वेढले होते. जवळचा नाला दुथडी भरून वाहात होता. दरवर्षीच पावसाळ्यात नाल्याचा पूर सळो की पळो करून सोडतो. पूर परिस्थितीनंतर त्या दरम्यान तब्बल १५ कुटुंब नाल्यापलीकडे वास्तव्यास गेले. त्यांना आता जवळपास १५ वर्षे झाली. परंतु अद्याप त्यांना कुठल्याही नागरी सुविधा मिळत नाही. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. भर पावसाळ्यात व नाल्याला पूर असताना जीव मुठीत घेऊन पाण्यासाठी पुरातून येथील महिला पायपीट करतात.
ज्ञानेश्वर ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील वाकानवासीयांचा वनवास संपता संपत नाही. ऐन पावसाळ्यात या गावातील महिला व नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पुरातून पायपीट करावी लागत आहे.
२००५ मध्ये वाकान गाव पुराने वेढले होते. जवळचा नाला दुथडी भरून वाहात होता. दरवर्षीच पावसाळ्यात नाल्याचा पूर सळो की पळो करून सोडतो. पूर परिस्थितीनंतर त्या दरम्यान तब्बल १५ कुटुंब नाल्यापलीकडे वास्तव्यास गेले. त्यांना आता जवळपास १५ वर्षे झाली. परंतु अद्याप त्यांना कुठल्याही नागरी सुविधा मिळत नाही. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. भर पावसाळ्यात व नाल्याला पूर असताना जीव मुठीत घेऊन पाण्यासाठी पुरातून येथील महिला पायपीट करतात.
या गावात ९ जुलै २००५ रोजी दूध गंगा नदीला आलेल्या महापुराने होत्याचं नव्हतं करून टाकलं. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली. या नैसर्गिक आपत्तीत अनेक कुटुंबांची वाताहात झाली. एका रात्रीत सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना विस्थापित व्हावे लागले. त्यात ७१ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही १७ वर्षानंतर प्रलंबित आहे. महापुराच्या तांडवानंतर काहींनी गावाच्या दुसऱ्या टोकाला धावपळनगर म्हणून वसाहत स्थापन केली. तेथे ३० ते ३५ घरे आहे. त्यांना मूलभूत सुविधाही मिळत नाही. आजही तेथे पाणी उपलब्ध नाही. गुंडभर पाण्यासाठी महिलांना नदीतून मार्गक्रमण करावे लागत आहे.
मतदारसंघातील लोकप्रतिनिधींची अनास्था कायमच
या मतदारसंघांमध्ये अनेक अनेक दिग्गज राजकारणी आहेत. महत्वाची पदेही या भागाला मिळाली मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे पूरग्रस्त सुविधांपासून वंचित राहिले. स्थानिक नेत्यांनी केवळ पोकळ आश्वासने दिली. प्रत्येक निवडणुकीत मत मागितले. मात्र, पुनर्वसन अधांतरीच लटकले. किमान आता तरी तात्काळ उपाययोजना करून नागरिकांची हेळसांड थांबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गावात जर कुणाचं निधन झालं तर अंत्यसंस्कारासाठी नाल्याच्या पलीकडे पुराच्या पाण्यातून जावे लागते. जास्त पाणी असल्यास पुराचे पाणी उतरण्याची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे या नाल्यावर पुलाची आवश्यकता असल्याचे सरपंच अश्वजीत भगत यांनी सांगितले.